Russia Ukraine War: युक्रेनचा मोठा दावा; रशियाचे 30 टँक उद्ध्वस्त, 7 एयरक्राफ्ट, 6 हेलिकॉप्टर पाडले, 25 सैनिकही सरेंडर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 10:57 AM2022-02-25T10:57:10+5:302022-02-25T10:58:46+5:30
यूक्रेनच्या उत्तरेकडे ग्लुखोव्ह आणि पोबेडा भागांत युद्ध सुरू आहे. येथे रशियन सैन्याला अडवण्यात आले आहे. याशिवाय, चेर्निगोव्हच्या दिशेलाही बेलौस नदीच्या काठावर युक्रेनच्या सैनिकांनी रशियन सैन्याला अडवून ठेवले आहे. तसेच, युक्रेनचे सैन्य डोवझंका, खार्किव, अख्तिरका आणि सुमी भागाचे रक्षण करत आहे.
रशिया-युक्रेन युद्ध पेटले आहे. युक्रेन संपूर्ण ताकदीनिशी रशियन हल्ल्यांचा प्रतिकार करत आहे. यातच, युक्रेनच्या लष्कराचे कमांडर-इन-चीफ, व्हॅलेरी जालुझनी यांनी, आपण 30 रशियन टँक नष्ट केल्याचा, 7 विमाने आणि 6 हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा केला आहे. एवढेच नाही, तर 25 रशियन सैनिकांनी युक्रेनच्या सैन्यापुढे शरणागती पत्करल्याचेही जालुझनी यांनी म्हटले आहे. याच वेळी, युक्रेनचे सैन्य खेरसॉनला वाचविण्यासाठी लढत आहे, असेही ते म्हणाले.
यूक्रेनच्या उत्तरेकडे ग्लुखोव्ह आणि पोबेडा भागांत युद्ध सुरू आहे. येथे रशियन सैन्याला अडवण्यात आले आहे. याशिवाय, चेर्निगोव्हच्या दिशेलाही बेलौस नदीच्या काठावर युक्रेनच्या सैनिकांनी रशियन सैन्याला अडवून ठेवले आहे. तसेच, युक्रेनचे सैन्य डोवझंका, खार्किव, अख्तिरका आणि सुमी भागाचे रक्षण करत आहे.
युक्रेनमध्ये 137 जणांच्या मृत्यूचा दावा -
रशियाच्या हल्ल्यात युक्रेनचे 137 लोक मृत्यूमुखी पडले आहेत. तर 316 जण जखमी झाले आहेत, असा दावा युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी केला आहे. रशियाविरुद्धच्या युद्धासाठी युक्रेन सैन्याची जमवाजमव करत आहे. तत्पूर्वी, रशियाविरुद्धच्या युद्धात युक्रेनला एकाकी सोडण्यात आले असल्याचेही त्यांनी म्हटले होते. या युद्ध जन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी युक्रेनच्या लष्कराने आपल्या नागरिकांना 10,000 असॉल्ट रायफल्स देखील वाटल्या आहेत.
चेर्नोबिल अणु ऊर्जा प्रकल्पावर रशियन सैन्याचा ताबा -
युक्रेनचे राष्ट्रपती कार्यालयाचे सल्लागार मायखाइलो पोडोलीक यांनी गुरुवारी, रशियन सैन्याने चेर्नोबिल अणु ऊर्जा प्रकल्पावर कब्जा केल्याचे म्हटले होते. तसेच रशियाचा चेर्नोबिलवरील कब्जा हा युरोपीयन देशांसाठी मोठा धोका आहे, असेही त्यांनी म्हटले होते.
पुतिन यांच्याविरोधात रशियातच आंदोलन -
रशिया-युक्रेन युद्धाचे पडसाद संपूर्ण जगात दिसून येत आहेत. आता तर खुद्द रशियातच रशियाच्या या कारवाईचा विरोध होत आहे. या हल्ल्याविरोधात रशियाच्या वेगवेगळ्या शहरांत लोक आंदोलन करत आहेत. तसेच लोक राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या या कारवाईवर टीका करत आहेत. या हल्ल्याचा विरोध करणारे लोक रशियाची राजधानी मॉस्कोसह 53 इतर शहरांमध्ये रस्त्यावर उतरून निदर्शने करत आहेत. या आंदोलकांना रोखण्यासाठी रशियन पोलीसही तयार आहेत. स्थानिक माध्यमांतील वृत्तांनुसार, अशा प्रकारे आंदोलन करणाऱ्या 1700 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.