रशिया आणि युक्रेनमधील युद्धाची धग सातत्याने वाढताना दिसत आहे. आज युद्धाचा चौथा दिवस आहे. दोन्ही देशांमध्ये तुर्तासतरी तोडगा निघेल, असे वाटत नाही. दरम्यान,युक्रेनने रशियाविरोधात मोठे पाऊल उचलले आहे. आता युक्रेनने थेट आंतरराष्ट्रीय न्यायालयाचाच दरवाजा ठोठावला आहे. राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी ट्विट करत, युक्रेनने रशिया विरोधात आयसीजेकडे अर्ज केल्याचे म्हटले आहे.
"रशियाला आक्रामकतेच्या समर्थनासाठी, नरसंहारासंदर्भात जबाबदार धरायला हवे. आता रशियाला सैन्य कारवाई थांबवण्यासंदर्भात तातडीने आदेश देण्याचा निर्णय घेण्यात यावा, अशी आम्ही विनंती करतो. तसेच पुढील आठवड्यात ट्रायलला सुरुवात होईल, अशी आशा करतो. अशा आशयाचे ट्विट झेलेन्स्की यांनी केले आहे.
"रशियाला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतून बाहेर करायला हवे" -युक्रेन रशिया विरोधात वेगवेगळ्या खेळी खेळत आहे. युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे की, रशियाने आपल्या देशावर हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर, त्याला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतून बाहेर करायला हवे. झेलेन्स्की रविवारी एका व्हिडिओ संदेशात म्हणाले, "रशियाने युक्रेनवर केलेले आक्रमण हे नरसंहाराच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. तसेच, रशियाने वाईटाचा मार्ग निवडला आहे आणि जगाने त्याला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतून बाहेर करायला हवे."