Russia Ukraine War : मोठी बातमी! युक्रेनच्या लष्करी प्रशिक्षण केंद्रावर रशियाचा मिसाईल हल्ला, 100 हून अधिक सैनिक ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 10:13 PM2022-03-20T22:13:10+5:302022-03-20T22:13:44+5:30
रशिया आणि युक्रेन यांच्यात दिवसें-दिवस निर्णायक युद्ध होताना दिसत आहे. यातच, रशियन सैन्याने जिटोमिर भागातील युक्रेनच्या लष्करी प्रशिक्षण केंद्रावर ...
रशिया आणि युक्रेन यांच्यात दिवसें-दिवस निर्णायक युद्ध होताना दिसत आहे. यातच, रशियन सैन्याने जिटोमिर भागातील युक्रेनच्या लष्करी प्रशिक्षण केंद्रावर क्षेपणास्त्र डागले, यात सुमारे 100 हून अधिक युक्रेनियन आणि परदेशी सैनिक ठार झाले, असा मोठा दावा रशियन मीडिया स्पुतनिकने केला आहे.
रशियन संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इगोर कोनाशेकोव्ह यांनी रविवारी जारी केलेल्या एका निवेदनातील दाव्यानुसार, रशियाने या युद्धात 25व्या दिवशी युक्रेनचे मोठे नुकसान केले आहे. एवढेच नाही, तर रशियाने जिटोमिर भागातील युक्रेनच्या लष्करी प्रशिक्षण केंद्रावर मिसाईल डागले. यात युक्रेनचे 100 हून अधिक सैनिक ठार झाले असेल्याचे सांगण्यात येते.
तर, दुसरीकडे युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. मात्र याचवेळी, ही चर्चा अयशस्वी ठरल्यास तिसरे महायुद्ध सुरू होऊ शकते, असेही ते म्हणाले.
दरम्यान, युक्रेन सरकारने दावा केला की, त्याच्यासोबतच्या युद्धात रशियन सैन्याचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारच्या दाव्यानुसार आतापर्यंत 14700 रशियन सैनिक मारले गेले आहेत. याशिवाय 96 विमाने, 118 हेलिकॉप्टर, 476 टँक, 21 यूएव्ही, 1487 लष्करी वाहने, 44 अँटी एअरक्राफ्ट नष्ट करण्यात आली आहेत.