रशिया-युक्रेन (Russia-Ukraine) युद्धाचे पडसाद संपूर्ण जगात दिसून येत आहेत. जगभरातून रशियाच्या या कारवाईचा विरोध होत आहे. खुद्द रशियातही या कारवाईचा अथवा रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा विरोध होत आहे. या हल्ल्याविरोधात रशियाच्या वेगवेगळ्या शहरांत लोक आंदोलन करत आहेत. तसेच लोक राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या या कारवाईवर टीका करत आहेत.
पुतिन यांच्या कारवाईवर टीका -माध्यमांतील वृत्तानुसार, या विरोधाला गुरुवारपासूनच सुरुवात झाली आहे. हा हल्ला योग्य नाही, असे म्हणणाऱ्या लोकांची संख्या फार मोठी आहे. या हल्ल्याचा विरोध करणारे लोक रशियाची राजधानी मॉस्कोसह 53 इतर शहरांमध्ये रस्त्यावर उतरून निदर्शने करत आहेत.
परिस्थिती हाताळण्यास पोलीस तयार -तसेच, या आंदोलकांना रोखण्यासाठी रशियन पोलीसही तयार आहेत. स्थानिक माध्यमांतील वृत्तांनुसार, अशा प्रकारे आंदोलन करणाऱ्या 1700 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
इतर देशांतही लोक रस्त्यावर -रशियाने गुरुवारी युक्रेनवर हल्ला केला. या हल्ल्याचे वृत्त जगभर पसरताच अनेक देशांमध्ये याविरोधात निदर्शने सुरू झाली आहेत. लोक बॅनर आणि पोस्टर घेऊन रस्त्यावर उतरत आहेत आणि रशियाच्या या कृतीचा निषेध करत आहेत.
आतापर्यंत 137 जणांचा मृत्यू - रशिया आणि युक्रेन युद्धात पहिल्याच दिवशी जवळपास 137 जणांचा मृत्यू झाला आहे. रशियाच्या या हल्ल्यात 57 युक्रेनीयन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 169 लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे.