सध्या युक्रेनमध्ये रशियन सैन्यांने धुमाकूळ घातला आहे. युक्रेनमध्ये रशियाकडून होत असलेला विध्वंस संपूर्ण जग पाहत आणि ऐकत आहे. मात्र, तरीही युक्रेन मागे हटायला तयार नाही. दरम्यान, युक्रेन-रशिया युद्धाच्या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्र महासभेत आपतकालीन सत्रही बोलावण्यात आले. याच सत्रात, युक्रेनच्या युनायटेड नेशन्समधील राजदूताने युक्रेनमधील एका घटनेचा संदर्भ देत, रशियन सैनिकाचा संदेश वाचला. यात रशियन सैन्य आता युक्रेनियन नागरिकांवरही हल्ले करत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
खरे तर हे युद्ध थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्र महासभेचे आपत्कालीन सत्र बोलावण्यात आले होते. या सत्रात, रशियाने युक्रेनसोबतचे युद्ध थांबवण्यासंदर्भातील प्रस्तावाला अनेक देशांच्या राजदूतांनी पाठिंबा दिला. या सत्राला संबोधित करताना संयुक्त राष्ट्रातील युक्रेनचे राजदूत सर्गेई किस्लित्स्या म्हणाले, एका रशियन सैनिकाने आपल्या आईला फोनवरून जो अखेरचा मेसेज पाठवला, त्यानंतर त्या सैनिकाचा युद्धात मृत्यू झाला.
राजदुतांच्या मते त्या रशियन सैनिकाने आपल्या आईला केलेल्या मेसेजमध्ये लिहिले, 'आई मी युक्रेनमध्ये आहे. येथे खरे युद्ध सुरू आहे आणि मला भीती वाटत आहे. आम्ही सर्वच शहरांवर बॉम्बिंग करत आहोत. एवढेच नाही, तर आम्ही नागरिकांनाही निशाणा बनवत आहोत.' यापूर्वी, त्या रशियन सैनिकाची आई त्याला विचारते की, त्याला बोलण्यासाठी एवढा वेळ का लागला? आणि तुझ्यासाठी एक पार्सल पाठवता येऊ शकते? यानंतर हा सैनिक असा मेसेज करतो.
एवढेच नाही, तर हा सैनिक पुढे लिहितो, 'आम्हाला सांगण्यात आले होते की, युक्रेनची जनता आपले स्वागत करेल. मात्र, ते आमच्या वाहनांच्या खाली पडत आहेत. स्वतःला चाकांखाली फेकत आहेत आणि आम्हाला पुढे जाण्यास विरोध करत आहेत. ते आम्हाला फॅसिस्ट म्हणत आहेत. आई, हे फार कठीण आहे.' हा मेसेज वाचताना युक्रेनचे राजदूत सभेत म्हणाले, की 24 फेब्रुवारीपासून सुरू झालेली ही शोकांतिका किती मोठी आहे, याची कल्पना करा. तसेच, हे सर्व तुमच्या समोर घडत आहे, अशीही कल्पना करा, असेही ते म्हणाले.