वॉश्गिंटन – रशियानं यूक्रेनसोबत युद्ध पुकारून आज १६ दिवस झाले आहे. रशियानं यूक्रेनच्या अनेक शहरांवर घातक हल्ले केलेत. त्यात प्रचंड नुकसान आणि जीवितहानी झाली आहे. रशियाच्या हल्ल्याला यूक्रेनच्या सैन्याने आणि सर्वसामान्य नागरिकांनीही कडवा विरोध करत प्रतिकार केला आहे. जगभरात रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी घेतलेल्या युद्धाच्या निर्णयाचा कडाडून विरोध होत आहे. रशिया-यूक्रेन युद्धामुळे जगात तिसरं महायुद्ध पेटू शकतं अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रशियानं यूक्रेनवर(Russia Ukraine War: केलेल्या आक्रमणामुळे अमेरिकेसह नाटो संघटनेतील देशांनी रशियावर अनेक निर्बंध लागू केले आहेत. त्यातच आलेल्या ताज्या रिपोर्टनुसार, जगातील बहुतांश देशाने रशियावर निर्बंध लादल्याने अमेरिकेची(America) चांदी झाली आहे. अमेरिकेच्या संरक्षण कंपन्या हत्यारांचा पुरवठा करून अब्जावधी डॉलरची कमाई करत आहे. त्याचसोबत यामुळे चीनलाही फायदा झाला आहे. नेमकं या रिपोर्टमध्ये काय आहे याबाबत जाणून घेऊया.
एशिया टाइम्सच्या रिपोर्टनुसार, रशिया-यूक्रेन युद्धामुळे संरक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खर्च होऊ लागला आहे. यूरोपियन युनियननं ४५ कोटी युरोची हत्यारं खरेदी करून यूक्रेनला देणार असल्याचं सांगितले आहे. तर अमेरिकेनेही ३५ कोटी डॉलरचं अतिरिक्त सैन्य मदत देणार असल्याचं जाहीर केले आहे. त्यापूर्वी अमेरिकेने ६५ कोटी डॉलरचं सैन्य मदत यूक्रेनला दिली होती. हे सर्व मिळून अमेरिका आणि नाटो देशांनी १७ हजार एँन्टीटँक हत्यारं आणि २ हजार एँन्टी एअरक्राफ्ट मिसाइल पाठवली आहेत.
इतकचं नाही तर यूक्रेनमध्ये रशियाच्या विरोधात सुरू झालेल्या बंडखोर गटाला ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, तुर्की आणि कॅनडाच्या नेतृत्वात एक आंतरराष्ट्रीय संघटना तयार होत आहे. या सर्व युद्धजन्य स्थितीमुळे जगातील हत्यार उत्पादक कंपन्यांची चांदी झाली आहे. अमेरिकन कंपनी रेथियान स्टिंगर मिसाइल बनवते. त्याशिवाय रेथियान लॉकहिड मॉर्टिनसोबत मिळून जेवलिन अँन्टी टँक मिसाइल बनवते जे अमेरिका आणि अन्य नाटो देशांनी मोठ्या प्रमाणात यूक्रेनला पाठवलं आहे.
यूक्रेनवर रशियानं केलेल्या हल्ल्यानंतर लॉकहिड आणि रेथियान यांच्या शेअरमध्ये १६ ते ३ टक्क्यांनी दर वाढले आहेत. त्याशिवाय ब्रिटनची कंपनी बीएई सिस्टम शेअर दरात २६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या कंपन्या त्यांच्या गुंतवणुकदारांना कमाईबद्दल सांगत आहेत. रेथियानं २५ जानेवारीला सांगितले होते की, यूएईत ड्रोन हल्ले आणि दक्षिण चीनमध्ये तैवान संघर्ष पाहता संरक्षणावर खर्च वाढला आहे. त्याचा आम्हाला फायदा होऊ शकतो. आता यूक्रेन रशियात युद्ध सुरू झाल्यानंतर जर्मनी आणि डेनमार्क दोन्ही देशांनी संरक्षण बजेट वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
शस्त्र उद्योगात अमेरिका जगात एक नंबरला आहे. २०१६ ते २०२० या कालावधीत जगात एकूण विक्री झालेल्या शस्त्रांमध्ये ३७ टक्के अमेरिकन कंपन्यांनी विक्री केली आहे. त्याशिवाय २० टक्के रशिया, ८ टक्के फ्रान्स, जर्मनी ६ टक्के तर चीन ५ टक्के इतके आहे. रशियाच्या हल्ल्यानंतर तुर्कीनं यूक्रेनला घातक ड्रोन विमान पाठवले आहेत. पाश्चात्य देशांनी घातलेल्या निर्बंधामुळे रशियाच्या संरक्षण उत्पादक कंपन्यांवर परिणाम झाला आहे. रशियाकडून भारत हत्यारं कमी खरेदी करत आहे. अमेरिकेच्या दबावामुळे आता हे प्रमाण आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्यात चीनच्या हत्यार विक्रीत वाढ झाल्याचंही पाहायला मिळत आहे.