कीव – जगातील बलाढ्य देशांपैकी एक मानल्या जाणाऱ्या रशियानं गेल्या गुरुवारी यूक्रेनवर हल्ला केला. मागील ६ दिवसांपासून रशिया-यूक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. रशिया सातत्याने यूक्रेनवर हल्ला करतंय. त्याचवेळी यूक्रेनचे राजदूत ओकसाना मार्कारोवा यांनी हैराण करणारा दावा केला आहे. युद्धाच्या ५ व्या दिवशी रशियानं यूक्रेनविरोधात बंदी घातलेला थर्मोबॅरिक शस्त्राचा(Thermobaric Weapon) वापर केला आहे.
मार्कारोवा म्हणाले की, रशियाने सोमवारी व्हॅक्यूम बॉम्बचा(‘Vacuum Bomb) वापर केला, ज्यावर जिनिव्हा करारानुसार बंदी आहे. थर्मोबॅरिक शस्त्रे पारंपारिक दारूगोळा वापरत नाहीत. हे उच्च-दाबाच्या स्फोटकांनी भरलेले आहेत. हे शक्तिशाली स्फोट घडवण्यासाठी आसपासच्या वातावरणातील ऑक्सिजन शोषून घेतात. रिपोर्टनुसार, थर्मोबेरिक बॉम्बची गणना जगातील सर्वात घातक आण्विक शस्त्रांमध्ये केली जाते. हा २००७ मध्ये रशियाने निर्मित केला होता. ७१०० किलो वजनाचा हा बॉम्ब वापरल्यावर वाटेतल्या इमारती आणि माणसांचा नाश होतो. त्याला एयरोसोल बॉम्ब असंही म्हणतात. रशियाने २०१६ मध्ये सीरियावर या व्हॅक्यूम बॉम्बचा वापर केला होता. हा अतिशय धोकादायक बॉम्ब आहे. ४४ टन टीएनटीच्या सामर्थ्याने त्याचा स्फोट होऊ शकतो असं पोर्ट्समाउथ युनिव्हर्सिटीचे पीटर ली यांनी सांगितले.
व्हॅक्यूम बॉम्बची खासियत काय आहे?
या व्हॅक्यूम बॉम्बचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो ऑक्सिजन शोषून घेतो आणि मोठा स्फोट घडवतो. अशा स्फोटांमुळे, अल्ट्रासोनिक शॉकवेव्ह त्यातून बाहेर पडतात आणि अधिक विनाश घडवून आणतात. त्यामुळे ते इतर शस्त्रांपेक्षा अधिक शक्तिशाली मानले जाते. रशियानेही हा बॉम्ब तयार केला होता जेणेकरून आम्ही किती शक्तिशाली आहे हे जगाला सांगता येईल. कधीही कोणताही देश रशियावर हल्ला करण्यापूर्वी अनेक वेळा विचार करेल यामागे उद्देश होता.
फादर ऑफ ऑल बॉम्ब ३०० मीटरच्या परिघात नुकसान करू शकतो. हे विध्वंसक शस्त्र जेटमधून टाकले जाते आणि हवेच्या मध्यभागी त्याचा स्फोट होतो. ते हवेतून ऑक्सिजन बाहेर काढते आणि लहान आण्विक शस्त्राप्रमाणेच प्रभाव निर्माण करते. या शक्तिशाली बॉम्बमुळे अण्वस्त्रांप्रमाणे पर्यावरणाला कोणताही धोका नाही.
बॉम्ब बनवण्यात अमेरिकेचाही हात
हा धोकादायक बॉम्ब तयार करण्यामागे अमेरिकेचा सर्वात मोठा हात आहे. अमेरिकेने २००३ मध्ये 'मदर ऑफ ऑल बॉम्ब' तयार केला होता, ज्याचे नाव GBU-43/B आहे. तो ११ टन टीएनटीच्या शक्तीने स्फोट करू शकतो, तर रशियन बॉम्ब ४४ टन टीएनटीच्या शक्तीने स्फोट करण्यास सक्षम आहे. अमेरिकेने तयार केलेल्या बॉम्बला प्रत्युत्तर म्हणून रशियाने 'फादर ऑफ ऑल बॉम्ब' तयार केला.