Russia-Ukraine War: रशियाकडे फक्त १० दिवस उरलेत, आपोआप चितपट होईल; अमेरिकेच्या माजी जनरलचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 07:52 AM2022-03-15T07:52:36+5:302022-03-15T08:04:16+5:30
Russia Artilary about to end: युक्रेनचे सैन्य आणि नागरिक एवढ्या नेटाने लढत आहेत की रशियाची पुरती जिरली आहे. युद्धाच्या सुरुवातीलाच रशियन सैन्य युद्धसामुग्री, रणगाडे तिथेच सोडून शरणागती पत्करू लागले होते.
रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या २० दिवसांपासून युद्ध सुरु आहे. पहिल्या दोन दिवसांत युक्रेन काबिज करण्याचे रशियाचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. युक्रेनचे सैन्य आणि नागरिक एवढ्या नेटाने लढत आहेत की रशियाची पुरती जिरली आहे. युद्धाच्या सुरुवातीलाच रशियन सैन्य युद्धसामुग्री, रणगाडे तिथेच सोडून शरणागती पत्करू लागले होते. यामुळे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना या सैनिकांसाठी मोठी घोषणा करावी लागली होती. याचबरोबर चेचेनी योद्ध्यांना देखील या युद्धात उतरवावे लागले होते. परंतू, आता रशियाकडे फक्त १० दिवस उरल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.
रशियाकडे आता फक्त १० दिवस उरले आहेत, त्या दहा दिवसांत युक्रेनने खिंड लढविली तर रशिया आपोआपच चितपट होईल, असा दावा अमेरिकेचे माजी जनरल बेन होजेस यांनी केला आहे. यावेळी त्यांनी रशियाला ४८ तासांत युद्ध का जिंकायचे होते, याचे कारणही सांगितले आहे.
रशियाचा युक्रेनवर हल्ला हे एक क्विक ऑपरेशन होते. त्यांना काही तासांत युक्रेन ताब्यात घ्यायचे होते. परंतू युक्रेनी सैन्याने जोरदार प्रतिकार केल्याने त्य़ाचे रुपांतर युद्धात झाले. रशियाकडे युद्ध सुरु ठेवण्यासाठी पुरेसा दारुगोळा नाही. तो साठा संपत आला आहे. तसेच एवढ्या तातडीने नवीन दारुगोळा तयार करणे किंवा उपलब्ध करणे हे देखील निर्बंधांमुळे शक्य नाहीय. पुढील १० दिवसांत हा दारुगोळा संपून जाईल आणि रशिया लढण्यालायक राहणार नाही, असे होजेस यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे युरोपीय देश आणि अमेरिकेने युक्रेनला शस्त्रास्त्रे देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे युक्रेनी सैन्य त्यांचे युद्ध पुढे सुरु ठेवणार आहेत. अमेरिकेने यासाठी युक्रेनला निधीची तरतूद देखील केली आहे. या निधीतून युक्रेन प्रत्येक देशाकडून त्यांची त्यांची घातक शस्त्रे विकत घेऊ शकणार आहे. शिवाय अमेरिका देखील युक्रेनला युद्धसामुग्री पुरविणार आहे. एकंदरीत रशियाकडील शस्त्रसाठा संपत आल्यास रशियालाच शस्त्रसंधी किंवा माघार घ्यावी लागण्याची शक्यता आहे.