मारियुपोल: रशियाचे युक्रेनवरील हल्ले (Russia Ukraine War) सुरूच आहेत. रशिया-युक्रेन युद्धाचा २२ वा दिवस आहे. युक्रेनच्या विविध भागांवर केलेल्या भीषण हल्ल्यांमुळे मोठे नुकसान होत आहे. युक्रेनमधील लाखो रहिवासी देश सोडून इतरत्र स्थलांतरित होत आहेत. अद्यापही रशिया युद्ध थांबवायला तयार नाही. युक्रेनही जोरदार प्रत्युत्तर देत असून, माघार घेण्यास कोणताही देश तयार नाही. यातच आता रशियाने युक्रेनमधील एका थिएटरवर एअरस्ट्राइक केला असून, येथील मलब्याखाली जवळपास एक हजार जण दबले गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रशियाचे युक्रेनच्या विविध ठिकाणांवर हल्ले सुरूच आहेत. अशातच मारियुपोल थिएटर आणि स्वीमिंग पूलवर रशियाने एअरस्ट्राइक केला. रशियाच्या हल्ल्यामुळे विस्थापित झालेले सुमारे एक हजार लोकं या ठिकाणी आसऱ्याला आले होते. त्याच ठिकाणी रशियाने एअरस्ट्राइक केल्याचा दावा केला गेला असून, या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच १००० जण मलब्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. रशियाच्या एअरस्ट्राइकमध्ये किती जण मारले गेले, याचा अंदाज बांधणे कठीण आहे. मात्र, शेकडो लोकांचा मृत्यू झाला असावा, असे युक्रेनकडून सांगण्यात आले आहे.
तातडीने युद्ध रोखण्याचे रशियाला दिले आदेश
आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दोन्ही बाजूंनी हे युद्ध त्वरित थांबवावे, असे म्हटले आहे. रशिया आणि युक्रेनने हा वाद आता वाढवू नये, असे आयसीजेने आपल्या आदेशात नमूद केले आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय युक्रेनमध्ये रशियाच्या बळाचा वापर करत असल्याबद्दल अत्यंत चिंतित आहे, असे या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांनी म्हटले आहे. आता रशिया आयसीजेच्या आदेशाचे पालन करतो की नाही हे पाहावे लागेल.
बळाचा वापर केल्यानं आम्ही खूप चिंतीत आहोत
रशियाने युक्रेनमध्ये बळाचा वापर केल्याने आम्ही खूप चिंतीत आहोत. यातून आंतरराष्ट्रीय कायद्याच्या गंभीर समस्यांना जन्म दिला गेला आहे. न्यायालयाला युक्रेनमध्ये घडणाऱ्या मानवी शोकांतिकेची पूर्ण कल्पना आहे. न्यायालयाने रशिया आणि युक्रेनला सध्याच्या वादाचा पाठपुरावा न करण्याचे आदेश दिले आहेत. रशियाच्या बाजूने कोणत्याही पक्षाने यामध्ये हस्तक्षेप करू नये, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालय कोणताही निर्णय घेईल, तो सर्वांवर बंधनकारक असेल, असे न्यायाधीश जोन डोनोघ्यू यांनी न्यायालयाचा निर्णय वाचून दाखवताना सांगितले.
दरम्यान, एखाद्या देशाने आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यास नकार दिला, तर ICJ न्यायाधीश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे कारवाईची मागणी करू शकतात, जेथे रशियाला व्हेटो पॉवर आहे. युक्रेनने आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांना रशियाला तात्काळ लष्करी कारवाई थांबवण्याचे आदेश देण्याचे आवाहन केले. यापूर्वी ७ मार्च रोजी रशिया आणि युक्रेनमधील युद्धाबाबत आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी झाली होती. रशियाने सुनावणीवर बहिष्कार टाकला होता.