Russia Ukraine War: युक्रेन विरुद्धच्या युद्धात रशियाचंही मोठं नुकसान; आतापर्यंत २९ एअरक्राफ्ट आणि १९१ टँक उद्ध्वस्त!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 04:27 PM2022-02-28T16:27:07+5:302022-02-28T16:29:12+5:30
Russia Ukraine War: रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार त्यांनी आतापर्यंत 5,300 युक्रेनियन लोकांना ठार केले आहे. मात्र, याची पुष्टी अद्याप झालेली नाही.
Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाने मोठ्या प्रमाणावर विनाश केला आहे. रशियानं या युद्धात आपलं किती नुकसान झालंय याची माहिती दिली आहे. रशियाचे उप संरक्षण मंत्री हन्ना मलियार यांनी सोमवारी फेसबुकवर सांगितलं की, "रशियन सैन्याने युक्रेनमध्ये 24 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या चार दिवसांच्या लढाईत एकूण 29 विमानं, 29 हेलिकॉप्टर आणि तीन अनमॅन्ड एरियल व्हीकल गमावली आहेत. तसंच पाच हवाई संरक्षण प्रणालीचंही नुकसान झालं आहे". तसंच रशियानं आतापर्य़ंत युक्रेनचे १९१ रणगाडे, ८१६ लढाऊ वाहनं, २९१ वाहनं आणि दोन जहाजं पाडण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
लष्कराने 74 तोफा, एक बक विमानविरोधी क्षेपणास्त्र प्रणाली आणि 21 ग्रॅड मल्टिपल रॉकेट लॉन्चर गमावल्याची माहिती, रशियाच्या उप संरक्षण मंत्र्यांनी दिली आहे. तसंच युक्रेनच्या 5300 जणांना आतापर्यंत ठार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. महत्वाची बाब अशी की हा आकडा आणखी वाढू शकतो. कारण युद्धाच्या परिस्थितीत अचूक माहिती मिळवणं फार कठीण होऊन बसतं.
युक्रेनच्या नुकसानाचीही माहिती रशियानं दिली
युक्रेन विरुद्धच्या युद्धात आपले अनेक सैनिक मारले गेल्याचं रशियाकडून रविवारी मान्य करण्यात आलं होतं. "आमचे काही सैनिक शहीद झाले आहेत. तर काही जखमी झाले आहेत", असं रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते मेजर जनरल इगोर कोनाशेन्कोव यांनी सांगितलं. पण त्यांनी नेमका आकडा यावेळी जाहीर केला नाही. युक्रेनच्या तुलनेत रशियाचं नुकसान खूप कमी झाल्याचा दावा मात्र त्यांनी केला आहे. यु्क्रेनच्या एकूण १०६७ लष्करी तळांना आतापर्यंत लक्ष्य करण्यात आलं आहे. यात १७ कमांडिग पोस्ट आणि संपर्क केंद्रांचा समावेश आहे. तसंच ३८ डिफेंन्स मिसाइल सिस्टम आणि ५६ रडार प्रणालीही उद्ध्वस्त झाल्या आहेत.
युद्धात युक्रेनच्या ३५२ सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू
युक्रेनच्या गृहमंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार युद्धात आतापर्यंत देशातील १४ लहान मुलांसह एकूण ३५२ सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसंच ११६ लहान मुलांसह १६८४ लोक जखमी झाले आहेत. मंत्रालयानं रविवारी याबाबतची माहिती जाहीर केली. पण यात युक्रेनच्या लष्करातील किती जवानांचा मृत्यू झाला याची माहिती दिलेली नाही. दरम्यान, युक्रेनच्या केवळ लष्करी तळांवर हल्ला करण्यात येत असून सर्वसामान्य नागरिकांना कोणताही धोका नाही असा दावा रशियाकडून केला जात आहे.