Russia-Ukraine War: युक्रेन विरुद्धच्या युद्धात रशियन कोर्टाची मोठी कारवाई; इन्स्टाग्राम, फेसबुकवर घातली बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 09:28 PM2022-03-21T21:28:04+5:302022-03-21T21:28:24+5:30
रशिया आणि युक्रेनमध्ये भयंकर युद्ध सुरू आहे. रशियन सैन्याकडून सतत बॉम्बहल्ला सुरू आहे. दरम्यान, सोमवारी रशियाच्या न्यायालयाने मोठी कारवाई केली आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये भयंकर युद्ध सुरू आहे. रशियन सैन्याकडून सतत बॉम्बहल्ला सुरू आहे. दरम्यान, सोमवारी रशियाच्या न्यायालयाने मोठी कारवाई केली आहे. मेटा प्लॅटफॉर्म "दहशतवादी" असल्याचा दावा केल्यानंतर न्यायालयानं सोमवारी देशात फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर बंदी घातली आहे. रशियानं आधीच फेसबुकचा रशियन मीडियातील प्रवेश प्रतिबंधित केला आहे. युक्रेनमधील रशियन सैन्याची क्रूरता फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तितक्याच प्रमाणात दाखवली जात होती. पण आता या निर्बंधामुळे, रशियाच्या लोकांपर्यंत थेट माहिती पोहोचू शकणार नाही.
रशियाने २४ फेब्रुवारीला युक्रेनवर हल्ला केला. या हल्ल्याला जवळपास महिना होत आहे. दरम्यान, दोन्ही देशांचं मोठं नुकसान झालं आहे. युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये रशियन सैन्यानं केलेल्या भीषण हल्ल्यात एक शॉपिंग सेंटर उद्ध्वस्त झालं आहे. सोमवारी सकाळी गगनचुंबी इमारतींमध्ये असलेल्या या शॉपिंग सेंटरमधून आगीच्या ज्वाळा उठताना दिसल्या.
आपत्कालीन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कीव्हमध्ये रात्रभर झालेल्या गोळीबारात किमान आठ जण ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. रशियन हल्ले इतके तीव्र होते की इमारतींमधील जवळजवळ प्रत्येक खिडकीच्या काचा फुटल्या आहेत आणि त्यातील धातूच्या शिगाही वितळल्या आहेत.
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाची संपूर्ण जगाला झळ
युद्धात रशियाची स्थिती पूर्वीसारखी राहिलेली नाही, असा दावा युक्रेननं केला आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असलं, तरी संपूर्ण जगाला त्याची झळ जाणवत आहे. नाटो देशांनी भले रशियाशी थेट लढा सुरू केला नसला, पण त्यांच्या तयारीवरून जग मोठ्या आपत्तीकडे वाटचाल करत असल्याचं दिसून येत आहे. ब्रिटनमधील वृत्तपत्रानं याला दुजोरा दिला आहे. न्यूके वॉच या ब्रिटनच्या अण्वस्त्रांच्या हालचालींचा मागोवा घेणाऱ्या संस्थेनं दावा केला आहे की, ब्रिटन आपली अण्वस्त्रे सेफ हाऊसमधून स्कॉटलंडमधील रॉयल नेव्हीच्या शस्त्रास्त्र डेपोपर्यंत नेत आहे.
ब्रिटनचा 6 घातक आण्विक क्षेपणास्त्रांचा ताफा ग्लासगोमध्ये दिसला. ही अशी आण्विक क्षेपणास्त्रे आहेत, जी जल, जमीन आणि आकाश या तिन्ही ठिकाणांवरून सोडली जाऊ शकतात. ब्रिटनच्या आण्विक क्षेपणास्त्रांची ही हालचाल अशा वेळी होत आहे जेव्हा नाटो आणि रशिया युद्धापासून फक्त काही इंच दूर आहे. त्यामुळेच ब्रिटनच्या या कारवाईकडे अणुयुद्धाची तयारी म्हणून पाहिलं जात आहे.