Russia-Ukraine crisis: रशिया आणि युक्रेनमधील युद्धातभारताची भूमिका फार महत्वाची मानली जात आहे. एकीकडे युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी युक्रेन, अमेरिका आणि पाश्चात्य देश भारतावर दबाव आणत आहेत, तर दुसरीकडे रशियानेही भारताचा पाठिंबा मिळण्याची आशा व्यक्त केली आहे. युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्यावर टीका करणारा ठराव शुक्रवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) मांडला जाणार आहे. माध्यमांमधील वृत्तानुसार भारत यात रशियाला पाठिंबा देईल अशी आशा आहे, असं विधान रशियाचे सर्वोच्च राजनैतिक अधिकारी रोमन बाबुश्किन म्हणाले.
युक्रेनवरील रशियाच्या लष्करी कारवाईवर अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांकडून आणल्या जाणाऱ्या ठरावाच्या मसुद्यात टीका करण्यात येणार आहे. तथापि, यूएनचा ठराव संमत होणे कठीण आहे कारणढ काऊन्सिलचा स्थायी सदस्य असलेल्या रशियाकडे व्हेटो पावर आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या प्रस्तावाला जवळपास ११ देशांचं समर्थन मिळण्याची शक्यता आहे. यात भारताचंही रशियाला समर्थन मिळेल अशी आशा रशियाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
युक्रेनच्या प्रादेशिक सार्वभौमत्व, स्वातंत्र्य आणि प्रादेशिक अखंडेसाठी असलेल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार यूएनमध्ये केला जाईल. यासोबतच रशिया युक्रेनमधून तात्काळ आणि बिनशर्त सैन्य मागे घेण्याची मागणी करण्यात येईल. भारताचे परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत प्रस्ताव तयार झाल्यानंतरच भारत त्यावर निर्णय घेऊ शकेल असं म्हटलं होतं. भारतानं प्रस्तावाचा ड्राफ्ट पाहिला असून अजूनही त्यात काही बदल होण्याची शक्यता आहे, असंही भारताच्या वतीनं नमूद करण्यात आलं आहे.
भारताची सावध आणि संतुलित भूमिकारशियाच्या कारवाईवर टीका करण्यापासून भारतानं अजूनही स्वत:ला रोखलं आहे. संयुक्त राष्ट्रांची बैठक असो किंवा मग युक्रेनमध्या स्थायिक भारतीयांसाठी जारी करण्यात आलेली अॅडवायझरी असो यात कुठेही भारतानं रशियावर टीका तर सोडाच उल्लेख देखील केलेली नाही. भारतानं सर्व पक्षांचे न्यायहित जपण्याचं विधान केलं आहे.