रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध भडकले आहे. गेल्या महिनाभरापासून युद्ध सुरु आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन कोणत्याही क्षणी अणुबॉम्ब टाकतील अशी शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. असे असताना रशियाचे परराष्ट्र मंत्री अचानक भारत दौऱ्यावर येत असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे.
रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्गेई लावरोव यांचा अचानक भारत दौरा ठरला आहे, परंतू तारीख अद्याप समजलेली नाही. दुसरीकडे इस्त्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट देखील भारत दौऱ्यावर येत आहेत. परंतू त्यांना कोरोना झालेला आहे. यामुळे त्यांच्या दौऱ्याबाबत अनिश्चितता आहे. परंतू त्याचवेळी लावरोव हे येत असल्याने जगाच्या नजरा या दौऱ्याकडे लागल्या आहेत.
तसे पाहता चीनचे परराष्ट्र मंत्रीदेखील असेच अचानक भारत दौऱ्यावर आले होते. परंतू त्यांनी पाकिस्तान, अफगाणिस्तान दौराही केला होता. युक्रेन-रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर शांतीदूत म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. यामुळे लावरोव यांच्याशी कोणत्या विषयांवर चर्चा होते, ते कशासाठी भारतात येत आहेत, याबाबत उलट सुटल चर्चा होऊ लागल्या आहेत.
न्यूज १८ ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लावरोव हे रशियन कच्चे तेल खरेदी आणि शस्त्रास्त्रे खरेदी आदी विषयांवर चर्चा करू शकतात. याचा व्यवहार कसा करायचा यावर चर्चा होऊ शकते. युरोपीयन देशांनी तसेच बँकिंग सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांनी रशियाला सेवा पुरविणे बंद केल्याने रशियाच्या व्यवहारांवर मर्यादा आल्या आहेत. दोन्ही बाजुने रुबल-रुपयामध्ये व्यवहार केला जाण्याची शक्यता आहे.