कीव्ह – मागील १२ दिवसांपासून रशिया-यूक्रेन यांच्या घमाशान युद्ध सुरू आहे. रशियानं यूक्रेनवर आक्रमक हल्ला केला आहे. यूक्रेनच्या अनेक शहरांवर रशियानं मिसाइल हल्ले केले आहेत. यूक्रेनमध्ये बॉम्बहल्ल्यानं प्रचंड नुकसान आणि जीवितहानी झाली आहे. त्यात यूक्रेनमध्ये अडकलेल्या परदेशी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही पुढे आला आहे. यूक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय अडकले आहेत. त्यामुळे भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.
यूक्रेनसोबतच्या युद्धात रशियानं ४ शहरांत युद्धविरामाची घोषणा केली आहे. त्यामुळे भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. यूक्रेनच्या ज्या शहरांमध्ये रशियानं युद्धविरामची घोषणा केली आहे. त्यात राजधानी कीव्हसह मारियुपोल, खारकिव आणि सुमी शहरांचा समावेश आहे. रशियाकडून या शहरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर जाण्यासाठी मदत मिळणार आहे. यूक्रेनच्या सुमी शहरात अद्यापही मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. युद्धविरामामुळे येथून भारतीयांची सुटका करणं सोप्पं झालं आहे. शनिवारीही रशियानं युद्धविरामाची घोषणा केली होती. परंतु तेव्हा काही ठिकाणी या घोषणेचे उल्लंघन झाल्याचं आढळलं होतं.
रशियाकडून युद्धविरामाची घोषणा महत्त्वाच्या क्षणी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यासह यूक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमीर झेलेंस्की यांच्याशी संवाद साधणार आहेत. हे दोघंही पंतप्रधान मोदींसोबत वेगवेगळ्या वेळी फोनवरून बोलतील. मिळालेल्या माहितीनुसार, या संवादात यूक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्याच्या दृष्टीने चर्चा होईल. खारकीव इथं झालेल्या बॉम्बहल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता.
युद्धविराम ठरले अयशस्वी
युक्रेनमध्ये रविवारी मारियुपोल येथील दुसरा युद्धविरामदेखील अयशस्वी ठरला. त्या शहरात रशियाने हल्ले सुरू ठेवल्याचा आरोप युक्रेनने केला. युद्धाच्या अकराव्या दिवशी रशियाच्या लष्कराने खारकीव्ह व अन्य शहरांवरही आणखी जोरदार हल्ले चढवले होते. या माऱ्याच्या तीव्रतेमुळे युक्रेनमधील गॅस यंत्रणेची १६ गॅस पुरवठा केंद्रे बंद करण्यात आली. कनिव येथील जलविद्युत निर्मिती केंद्रावर कब्जा करण्यावर रशियाने आता लक्ष केंद्रित केले. अडकलेल्यांना काढण्यासाठी दोन्ही देशांनी मारियुपोल, वोल्नोवाखा या शहरांमध्ये शनिवारी काही तासांचा युद्धविराम घोषित केला मात्र, त्या कालावधीतही रशियाने हल्ले केल्याचा आरोप करून युक्रेनने नागरिकांना दुसऱ्या जागी नेण्याची मोहीम थांबवली होती. त्यानंतर रविवारी मारियुपोल येथे दुसऱ्यांदा लागू केलेला युद्धविराम अयशस्वी ठरला.
‘ऑपरेशन गंगा’ अंतिम टप्प्यात; १६ हजार भारतीय आले परत
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी राबविण्यात येत असलेले ‘ऑपरेशन गंगा’ अंतिम टप्प्यात पोहचले आहे. युक्रेनमधून आतापर्यंत १५ हजार ९०० भारतीय परतले आहेत. सोमवारी ८ विमाने पाठविण्यात येणार असून, १,५०० भारतीयांना परत आणण्यात येणार आहे.