रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर सध्या तुरुंगात असलेले रशियाचे विरोधी पक्षनेते अॅलेक्सी नेव्हेल्नी (Alexei Navalny) जबरदस्त भडकले आहेत. त्यांनी पुतीन यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. युक्रेन-रशिया मुद्द्यावर सलग 12 ट्विट करत त्यांनी आपले म्हणणे मांडले आहे. तसेच, पुतिन म्हणजे रशिया नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
मूक लोकांचा देश बनू नका -रशियन जनतेला नेव्हेल्नी म्हणाले, आपण किमान मूक आणि भ्याड लोकांचा देश बनू नये. एवढेच नाही, तर 100 वर्षांपूर्वीच्या घटनांसंदर्भातील वरवरच्या-ऐतिहासिक गप्पा रशियन लोकांसाठी युक्रेनियन लोकांना मारण्याचे निमित्त ठरत आहेत, हे पाहून मी गप्प बसू शकत नाही आणि बसणारही नाही, असेही नेव्हेल्नी यांनी म्हटले आहे.
'पुतिन म्हणजे रशिया नाही' -नेव्हेल्नी पुढे म्हणाले, मी स्वतः सोव्हिएत युनियनचाच आहे. मी सर्वांना शांततेसाठी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन करत आहे. पुतिन म्हणजे रशिया नाही. युद्धाच्या विरोधात रॅली काढली, म्हणून 6824 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. आपण आणखी वाट पाहू शकत नाही. याशिवाय, रशिया, बेलारूस अथवा जगातील कोणत्याही कोपऱ्यात आपल्या शहराच्या मुख्य चौकात जा आणि युद्धाचा निषेध करा, असे आवाहनही त्यांनी लोकांना केले.
तसेच, रशिया बाहेरील लोकांनीही त्या-त्या देशातील रशियन दुतावासासमोर जाऊन निदर्शने करत युद्ध थांबविण्याची मागणी करावी. आपल्याला भीतीवर नियंत्रण मिळविण्यासाठी बाहेर पडावे लागेल, असेही नेव्हेल्नी यांनी म्हटले आहे.