कीव्ह: रशिया आणि युक्रनमध्ये चौथ्या टप्प्यातील चर्चा काहीशी सकारात्मक झाल्याचे संकेत मिळत आहेत. यामुळे गेल्या २१ दिवसांपासून सुरु असलेले भयंकर युद्ध थांबण्याची चिन्हे आहेत. यावरून रशिया नरमला असल्याचे बोलले जात आहे. परंतू युद्धभूमीवरील परिस्थिती फार वेगळी दिसत आहे. रशिया कीव्ह ताब्यात घेण्यासाठी जोरदार हल्ले करत आहे. या संघर्षात युक्रेनला मोठे नुकसान सोसावे लागले असले तरी रशियाचेही युक्रेनने न झुकता मोठे नुकसान केले आहे.
या युद्धात रशियाच्या १२ कमांडरना जीव गमवावा लागला आहे. यामध्ये रशियाचा एक गुप्तहेर देखील आहे, जो युक्रेनमध्ये एका मोठ्या सिक्रेट मिशनवर आला होता. हे मिशन काय होते, हे अद्याप कोणालाही समजलेले नाही. परंतू, त्याच्या मृत्यूमुळे पुतीन यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
'द सन'च्या वृत्तानुसार य़ा रशियन गुप्तहेराचे नाव कॅप्टन एलेक्सी ग्लुशचक आहे. तो ३१ वर्षांचा होता. सायबेरिय़ाच्या ट्युमेनचा तो राहणारा होता. जीआरयू मिलिट्री इंटेलिजेंस स्पायमध्ये कॅप्टन पदावर होता. ग्लुशचक हा मारियुपोलोमध्ये सुरु असलेल्या भीषण लढाईत मारला गेला. रशियाने हे गुप्त ठेवले असले तरी त्याच्यावर शासकीय इममामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
ग्लूशचकच्या या गार्ड ऑफ ऑनर देतानाचे फोटो समोर आले आहेत. महिला दिना दिवशीच त्याचा मृत्यू झाला. त्या दिवशी त्याने त्याची आई आणि पत्नीला फोन केला होता. या दोघींना त्याने महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर सायंकाळी तो हल्ल्यात ठार झाला. आता त्याला युक्रेनच्या सैन्याने मारले की रशियन सैन्याने चुकून केलेल्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला हे कालांतराने उघड होण्याची शक्यता आहे.