Russia Ukraine War: युक्रेनचा जोश पाहून रशियन सैन्याचे उडाले होश! संयम संपला, अख्खे शहर उडवून देण्याची दिली धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 03:54 PM2022-03-02T15:54:59+5:302022-03-02T15:55:16+5:30
Russia Ukraine War Updates: हल्लेखोर रशियाचा युक्रेन सैन्याला अल्टीमेटम! रशियन सैन्याविरोधात युक्रेनचे नागरिक आता खुलेपणे समोर येऊ लागले आहेत. Starobilsk च्या लुहान्स्कमध्ये लोकांनी रशियन फौजांचा रस्ताच ब्लॉक केला आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये भीषण युद्ध सुरु आहे. गेले सात दिवस हे युद्ध सुरु आहे. पहिल्या दोन दिवसांत अख्खा युक्रेन ताब्यात घेण्याच्या इराद्याने आलेल्या रशियन सैन्याचा संयम आता सुटत चालला आहे. यामुळे रशियन सैन्याने हॉस्पिटल, नागरिकांवरही हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे युक्रेन नामोहरम होईल आणि शरणागती पत्करेल असे त्यांना वाटत आहे. परंतू युक्रेनी सैनिक रशियासोबत त्याच त्वेषाने लढत आहेत.
रशियाने खारकीववर जोरदार हल्ला चढविला आहे. तर खेरसन हे शहर ताब्यात घेतले आहे. आता युक्रेनला झुकविण्यासाठी रशियाने युक्रेनचे एक अख्खे शहरच उडवून देण्याची धमकी दिली आहे. शरणागती पत्करा अन्यथा कोनोटॉप शहरच उडवून देऊ अशी धमकी रशियाच्या सैन्याने दिल्याचा दावा महापौरांनी केला आहे. यासाठी अल्टीमेटम देण्यात आल्याचे ते म्हणाले.
रशियाच्या सैन्याला ना इंधन मिळत आहे ना खाण्या पिण्याच्या वस्तू. रशियाकडून कोणताही रसद पुरविली जात नसल्याने हे सैन्य नामोहरम झाले आहे. यामुळे रशियन सैन्याने देखील अनेक ठिकाणी युद्धास नकार दिल्याचा दावा युक्रेन करत आहे. अनेकांनी सरेंडर केल्याचेही म्हटले आहे. त्यातच युक्रेनी नागरिकांनी रशियन सैन्याच्या मार्गात काटे पेरण्यास सुरुवात केल्याने ते आणखीनच बेजार झाले आहेत.
रशियन सैन्याविरोधात युक्रेनचे नागरिक आता खुलेपणे समोर येऊ लागले आहेत. Starobilsk च्या लुहान्स्कमध्ये लोकांनी रशियन फौजांचा रस्ताच ब्लॉक केला आहे. दुसरीकडे कीववर मोठ्या प्रमाणावर बॉम्बफेक सुरु झाली आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी गेल्या सहा दिवसांत सहा हजारांहून रशियन सैनिकांना मारल्याचा दावा केला आहे. तसेच कीवपासून ३० किमी दुरवर बुचायेथे रशियन फौजांचा अख्खा जथ्थाच नेस्तनाभूत करण्यात आला आहे. सुमी येथून रशियन फौजा मागे परतू लागल्याचा दावा युक्रेनने केला आहे.