Russia-Ukraine War: चिंता वाढली! रशियन सैन्य आता युक्रेनमधील तीसऱ्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या दिशेने रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 12:07 PM2022-03-06T12:07:35+5:302022-03-06T12:07:55+5:30
रशियन सैन्याने आतापर्यंत दोन युक्रेनियन अणुऊर्जा प्रकल्प ताब्यात घेतले आहेत.
मागील दहा दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. आतापर्यंतची परिस्थिती पाहता रशिया युक्रेनवर भारी पडत असल्याचे दिसत आहे. यातच आता युक्रेनने पाश्चिमात्य देशांकडे युद्धासाठी शस्त्रे पुरवण्याणी विनंती केली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी शनिवारी पाश्चात्य राष्ट्रांकडे रशियन बनावटीची विमाने उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले आहे. तसेच, हवेत लढाई लढण्यासाठी विमाने न मिळाल्यास जमिनीवर रक्तपात वाढेल, अशी भीतीही व्यक्त केली आहे. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
रशियन सैन्याने आतापर्यंत दोन युक्रेनियन अणुऊर्जा प्रकल्प ताब्यात घेतले आहेत आणि ते तिसऱ्या प्रकल्पाच्या दिशेने पुढे जात आहेत, असे युक्रेनच्या अध्यक्षांनी शनिवारी यूएस सिनेटर्सशी केलेल्या कॉल दरम्यान सांगितले. सध्या धोक्यात असलेला तिसरा प्लांट युझनौक्रेन्स्क अणुऊर्जा प्रकल्प आहे, जो मायकोलायव्हच्या उत्तरेस १२० किलोमीटर अंतरावर आहे, असं वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सांगितलं.
रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेले युद्ध दिवसागणित भीषण होत चालले आहे. रशिया विरुद्ध युक्रेन युद्ध सुरू होऊन आठवडा उलटला आहे. या युद्धामध्ये दोन्हीकडून मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी होत आहे. दोन दिवसांपूर्वी देखील रशियन सैन्याने युक्रेनमधील युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा केंद्रावर गोळीबार केला होता. रशियन सैन्याने युक्रेनमधील अणुऊर्जा केंद्रावर गोळीबार केल्यानंतर अमेरिका, ब्रिटन वगैरे देशही या बाबतीत लगेच सक्रिय झाले. तसेच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना इशारा दिला आहे. अणुऊर्जा केंद्राचा विस्फोट झाल्यानंतर पूर्ण युरोपचा अंत होईल, असा वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी इशारा दिला.
जीवनावश्यक वस्तूंची रसद तोडली
मारियुपोल, खारकीव्ह, वोल्नोवाखा आदी ठिकाणांना रशियाच्या सैनिकांनी वेढा दिला असून, जीवनावश्यक वस्तूंची रसद तोडली आहे. त्यामुळे नागरिकांचे विलक्षण हाल होत आहेत. रशियाने मारियुपोल, वोल्नोवाखा शहरांपुरता काही तासांचा युद्धविराम केला होता. मात्र, युक्रेनच्या अन्य भागांमध्ये हल्ले सुरूच ठेवले होते.
फिनलंड-अमेरिका भेट
रशियाने, युक्रेनवर केलेले आक्रमण अन्यायकारक असल्याचे अमेरिका व फिनलंड या देशांचे मत आहे. अमेरिकेने, युक्रेनमध्ये आपले सैन्य पाठविण्यास याआधीच नकार दिला आहे. मात्र युक्रेनला आर्थिक व इतर प्रकारची मदत करण्यास अमेरिकेने पुढाकार घेतला आहे.