Russia Ukraine War: रशियन फौजा हबकल्या! युक्रेन सैन्याने अचानक पवित्रा बदलला; डोनाबास, खेरसानमध्ये घमासान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 03:01 PM2022-03-16T15:01:47+5:302022-03-16T15:09:36+5:30
Russia Ukraine War: युक्रेनने कालच रशियन फौजांचे नुकसान किती केले याची आकडेवारी जाहीर केली होती. यामध्ये १३५०० हून अधिक रशियन सैनिकांना मारल्याचे सांगण्यात आले.
रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या तीन आठवड्यांपासून घणघोर युद्ध सुरु आहे. रशियन सैन्याला काही केल्या युक्रेन सर करता आलेले नाही, तर युक्रेनी सैन्य एवढा चिवट प्रतिकार करत आहेत की रशियाला पुढे जाणे मुश्कील बनले आहे. आता युक्रेन सैन्याने तर पुढचा गिअर टाकला आहे. बचावाचा पवित्रा सोडून आक्रमण करण्यास सुरुवात केल्याने रशियन सैन्याची सळो की पळो परिस्थिती होण्याची शक्यता आहे.
युक्रेनने कालच रशियन फौजांचे नुकसान किती केले याची आकडेवारी जाहीर केली होती. यामध्ये १३५०० हून अधिक रशियन सैनिकांना मारल्याचे सांगण्यात आले. याचबरोबर लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर आणि अन्य युद्धसामुग्री मोठ्या प्रमाणावर नष्ट करण्यात आली आहे. दोन्ही देशांदरम्यान चर्चा चौथ्या फेरीमध्ये पोहोचली आहे. या फेरीत रशिया काहीसा नरमलेला दिसत असल्याचा दावा युक्रेनने केला आहे.
या पार्श्वभूमीवर आज युक्रेनच्या सैन्याचा पवित्रा बदलल्याचे दिसत आहे. रशियन सैन्याच्या ताब्यात गेलेले डोनाबास शहर पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी युक्रेनने आक्रमक पवित्रा घेतला आहे. दोनेत्स्क पीपुल्स रिपब्लिकने म्हटले की, डोनाबासमध्ये युक्रेनी सैनिक मोठ्या प्रमाणावर गोळीबार करत आहेत. युक्रेनकडून रशियन सैन्यावर १० मोर्टार डागल्या गेल्या आहेत.
तर दुसरे शहर खेरसनमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळावर युक्रेनच्या सैन्याने रशियन हेलिकॉप्टरवर जोरदार हल्ले चढविले आहेत. या हल्ल्याचे सॅटेलाईट फोटो देखील जारी करण्यात आले आहेत. या विमानतळावरील कमीतकमी तीन हेलिक़ॉप्टर्स उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.