Russia Ukraine War: युक्रेनच्या अणु प्रकल्पातून महत्वाची उपकरणे घेऊन गेले रशियन सैनिक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 08:56 AM2022-03-09T08:56:44+5:302022-03-09T08:57:11+5:30
Russia Ukraine War: युक्रेनमधील विशेष लष्करी ऑपरेशनदरम्यान रशियन सैन्याने झापोरिझिया आणि चेर्नोबिल अणुऊर्जा केंद्रे ताब्यात घेतली. यादरम्यान, रशियन सैन्याने चेर्नोबिल अणु प्रकल्पातून महत्वाची उपकरणे घेऊन गेले आहेत.
कीव: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध (Russia Ukraine War) सुरू आहे. रशियाकडून युक्रेनमधील अनेक शहरांवर बॉम्बफेक करण्यात येत आहे. त्याचवेळी रशियन सैन्यानेही जमिनीवरुन युक्रेनमध्ये प्रवेश केला आहे. यादरम्यान एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. युक्रेनच्या चेर्नोबिल अणु प्रकल्पातून (Chernobyl Nuclear Plant) काही महत्त्वाची उपकरणे रशियन सैनिकांनी नेल्याची माहिती समोर आली आहे.
अनेकांचे आयुष्य धोक्यात
या उपकरणांद्वारे रेडिओअॅक्टिव्ह कचऱ्यातील आण्विक सामग्रीवर लक्ष ठेवण्यात यायचे. मात्र आता त्याचे डेटा ट्रान्समिशन थांबले आहे. अशा स्थितीत आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पातून देखरेख यंत्रणा हटवल्यामुळे लोकांच्या सुरक्षेबाबत भीती व्यक्त केली आहे. अणुऊर्जा प्रकल्पातील धोकादायक किरणोत्सर्गावर यापुढे लक्ष ठेवता येणार नाही. त्यामुळे आता लोकांचे आयुष्य धोक्यात आले आहे.
त्रिपक्षीय बैठक होऊ शकते
तत्पूर्वी, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रविवारी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी (IAEA), रशिया आणि युक्रेन यांच्यात त्रिपक्षीय बैठक घेण्याच्या कल्पनेला योग्य म्हटले. व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारे किंवा तिसऱ्या कुठल्याही देशात ही बैठक आयोजित केली जाऊ शकते, असे ते म्हणाले.
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केली भीती
युक्रेनमधील विशेष लष्करी कारवाईदरम्यान रशियन सैन्याने झापोरिझिया आणि चेर्नोबिल अणुऊर्जा केंद्रांवर ताबा मिळवला. तत्पूर्वी, युक्रेनने आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीला कळवले की देशातील सर्वात मोठ्या झापोरिझिया अणुऊर्जा प्रकल्पातील सहापैकी दोन अणुभट्ट्या कार्यरत आहेत आणि रेडिओअॅक्टिव्ह पातळी सामान्य आहे. त्याच वेळी, युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमीर जेलेन्स्की यांनी युझनौक्रेन्स्क अणुऊर्जा प्रकल्पाकडे रशियन सैन्य जात असल्याने हा प्रकल्प धोक्यात असल्याची भीती व्यक्त केली.