किव्ह - युक्रेनमध्ये रशियन हल्ल्याला आज ३९ दिवस झाले आहेत. दरम्यान, काही प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या रिपोर्टनुसार किव्हवर पुन्हा एकदा युक्रेनचा कब्जा झाला आहे. युक्रेनचे सैन्य पुन्हा एकदा किव्हमध्ये आले तेव्हा तेथील परिस्थिती धक्कादायक होती. किव्ह शहरातील बाहेरच्या रस्त्यांवर अनेक बेवारस मृतदेह पडले होते. त्यातून तेथील भयावह स्थितीचे चित्र दिसत होते.
वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार किव्ह शहरातील एका गल्लीमध्ये २० जणांजचे मृतदेह सापडले आहेत. एएफपीने बुका शहराच्या महापौरांच्या हवाल्याने सांगितले की, येथे एक सामुहिक दफनभूमी सापडली आहे. तिथे २८० जणांते मृतदेह मिळाले आहेत. किव्ह आणि बुका येथून येत असलेली छायाचित्रे मानवतेला काळिमा फासणारी आहेत.
युक्रेनचे सैन्य हळुहळू खूप सावधानीपूर्वक किव्ह शहरामध्ये प्रवेश करत आहे. अगदी काही महिन्यांपूर्वीपर्यंत हसतं खेळतं शहर असलेलं किव्ह आता उदध्वस्त झालं आहे. शहरातील रस्त्यांवर मृतदेह पडले आहेत. युक्रेनचं सैन्य या मृतदेहांना हटवायलाही घाबरत आहे. या मृतदेहांमध्ये स्फोटके असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हे मृतदेह हटवण्यासाठी सैन्याकडून तारेचा वापर केला जात आहे.
युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की यांनी आपल्या व्हिडीओ संबोधनामध्ये इशारा दिला की, किव्हमधून माघारी परतत असलेले रशियन सैनिक घरे, हत्यारे आणि मृतदेहांजवळ बॉम्ब लावून गेलेले असू शकतात. त्यामुळे युक्रेनच्या सैन्यासमोर हे मृतदेह हटवण्याचे आव्हान आहे.
दरम्यान, किव्ह शहराच्या बाहेरील बुचा भागात परिस्थिती अधिक भयावह आहे. येथे युक्रेनच्या सैन्याने मोर्चा सांभाळला आहे. रशियन सैन्याकडून हा भाग परत घेतल्यानंतर होस्टोमेलमध्ये एंटोनोव्ह विमानतळाच्या एंट्रीगेटवर युक्रेनचे सैन्य तैनात झाले आहे. बुकामध्ये एका सामुहिक दफनभूमीमध्ये २८० च्या आसपास मृतदेह सापडले आहेत.