कीव: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज 14वा दिवस आहे. दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरूच असून रशियन हल्ल्यानंतर युक्रेनमधील परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या तीन फेऱ्या झाल्या आहेत, मात्र त्या अनिर्णित ठरल्या आहेत.
दरम्यान, रशियाने युक्रेनच्या सुमी भागात हवाई हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. रशियाने सुमीच्या निवासी भागांवर हल्ला केला आहे. रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यात 22 जण ठार झाले आहेत. सुदैवाने हल्ल्यात 2 मुलांसह 5 जणांचे प्राण वाचले. याशिवाय, रशिया युक्रेनची राजधानी कीववर सातत्याने हल्ले करत असून हवाई हल्ल्याबाबत पुन्हा एकदा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांना लवकरात लवकर बंकरमध्ये जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वीस लाख लोकांनी देश सोडलारशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत, सुमारे वीस लाख लोकांनी देश सोडला आहे. हे हे दुसऱ्या महायुद्धानंतरचे युरोपमधील सर्वात मोठे निर्वासन आहे. दरम्यान, मारियुपोलसह रशियन सैन्याने वेढलेल्या युक्रेनियन शहरांमध्ये परिस्थिती बिघडली आहे, सर्वत्र रस्त्यावर मृतदेह दिसत आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर हल्ला चढवला असून युक्रेनमधील युद्धामुळे रशिया कमकुवत होईल, पण संपूर्ण जग बळकट होईल, असे म्हटले.
पुतिनचा EU आणि NATO ला इशारायुक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युरोपियन युनियन आणि नाटो देशांना इशारा दिला असून पाश्चात्य देश युक्रेनला घातक शस्त्रे पाठवत असल्याचे म्हटले आहे. शस्त्रांचा पुरवठा बंद करावा, अन्यथा त्याचे घातक परिणाम होतील, असे पुतिन म्हणाले. युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने रशियाकडून तेल आणि वायूच्या आयातीवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे, तसेच रशियाकडून ऊर्जा आयात करण्यावर बंदी घातली आहे.