रशिया आणि युक्रेनमधील लढाई आता काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाहीय. एकटा पडल्याने युक्रेन लवकर शरणागती पत्करेल असे रशियाला वाटत होते. परंतू राजधानी कीवपर्यंत वेगाने धडक मारलेल्या रशियाला कीवमध्ये जोरदार प्रत्यूत्तर मिळत आहे. यातच युक्रेनने रशियाला युद्ध थांबवून चर्चेला येण्याचे निमंत्रण दिले होते. रशियाने ते स्वीकार केले होते. मात्र, आज रशियाने युक्रेनवर गंभीर आरोप केला आहे.
रशियाने केलेल्या दाव्यानुसार चर्चेसाठी जो प्रस्ताव दिला होता, तो युक्रेनने स्वीकारलेला नाही. यामुळे आता युक्रेनवर यापेक्षा जोरदार हल्ले चढविले जाणार आहेत. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने याची घोषणा केली आहे. सैन्याला युक्रेनवरील हल्ले आणखी वेगवान आणि आक्रमक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कीवने बेलारुसमध्ये होऊ घातलेल्या चर्चेच्या प्रस्तावाला नकार दिला आहे. तिथे आम्ही आमचे प्रतिनिधीमंडळ पाठविण्याचा प्रस्ताव दिला होता, असा दावा रशियाने केला आहे.
या आरोपांवर युक्रेनकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, धोक्याची घंटा वाजली आहे. रशियाचे सैन्य युक्रेनच्या जमिनीवर आता आणखी वेगाने व क्रूरतेने आक्रमण करणार आहेत. यामुळे उद्याचा दिवस गेल्या तीन दिवसांपेक्षा भयानक ठरण्याची शक्यता आहे. आजच रशियाने रहिवासी इमारतींवर जोरदार मिसाईल आणि बॉम्ब हल्ले केले होते. यापेक्षा जास्त हल्ले उद्यापासून सुरु होण्याची शक्यता आहे.
त्यातच अमेरिकेने युक्रेनला शस्त्रास्त्रे खरेदीसाठी पैसे पाठविले आहेत. तसेच फ्रान्सने शस्त्रे पाठविली आहेत. ती वाटेत असल्याचा दावा युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केला आहे. यामुळे हे युद्ध दोन्ही बाजुंनी आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.