युक्रेनवर हल्ला केल्यावरून अमेरिकेसह युरोपियन देश रशियावर निर्बंध लादत आहेत. आता रशियाच्या कच्च्या तेलाच्या उत्पन्नावरच घाव घालण्यात येणार आहे. अवघा युरोप रशियाकडून कच्चे तेल आणि गॅस खरेदी करतो. ही खरेदी युरोपला बंद करायची आहे. परंतू, सौदी सोबत आल्याशिवाय हे शक्य होणार नाही. हे देश भारतावरही दबाव टाकत आहेत. परंतू, भारत रशियाकडून एवढे तेल खरेदी करत नाही. रशियन तेलावर निर्बंध आणण्यात येणार असताना सौदीच्या राजाने पाश्चिमात्य देशांचे मनसुबे उधळून लावले आहेत.
कच्च्या तेलाचे निर्यातदार असलेल्या सौदी अरेबियाने अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांचा दबाव झुगारून लावला आहे. रशियाला ओपेक प्लस देशांच्या संघटनेतून बाहेर काढणार नाही, असे स्पष्ट शब्दांत सौदीच्या राजाने सुनावले आहे. सौदी अरेबिया रशियासोबत आपले सहकार्य सुरुच ठेवणार आहे. ओपेक प्लसमधील देश रशियासोबत काम करतील असेही म्हटले आहे.
प्रिंस अब्दुलअजीज यांनी फायनांशिअल टाईम्सला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी ओपेकला राजकीय रंगात ओढू नका, असे म्हटले. उलट ओपेक देशांच्या या संघटनेची जगाने स्तुती करायला हवी. आम्ही एका सहकार्य करारावर काम करत आहोत, यात रशियाही सहभागी आहे, असे म्हटले आहे. ओपेक प्लस ही २४ कच्च्या तेलाचे उत्पादन घेणाऱ्या देशांची संघटना आहे. यामध्ये १४ ओपेक देश आणि रशियासह १० गैर ओपेक देश आहेत. या संघटनेची स्थापना २०१७ मध्ये करण्यात आली. कच्च्या तेलाच्या उत्पादनात समन्वय आणि जागतिक किंमती स्थिर ठेवण्यासाठी ही संघटना स्थापन करण्यात आली होती.
सौदी अरेबिया आणि अमेरिका हे चांगले मित्र मानले जात होते. परंतू जेव्हापासून बायडेन सत्तेचत आले तेव्हापासून या मैत्रीत कटुता आली आहे. वॉशिंग्टन पोस्टचे सौदी पत्रकार जमाल खशोग्गी यांची हत्या झाल्यावरून हा वाद सुरु झाला आहे. तेव्हापासून सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान अमेरिकेच्या निशान्यावर आहेत.