Russia-Ukraine War: पुतिन यांची २४ तासांची मुदत, यूक्रेनच्या रस्त्यांवर ६४ किमी रशियन सैन्याचा ताफा; सॅटेलाइट फोटोतून खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 10:13 AM2022-03-01T10:13:17+5:302022-03-01T10:13:32+5:30
यूक्रेनची राजधानी कीववर अखेरचा मोठा हल्ला करण्याच्या तयारीत रशिया आहे.
कीव – रशिया-यूक्रेन यांच्यातील युद्ध गुरुवार सकाळपासून सुरू आहे. रशियन सैन्य केवळ यूक्रेनच्या सीमेत घुसलं नाही तर मोठ्या संख्येने असलेल्या रहिवासी परिसरात बॉम्बहल्लेही केले. यूक्रेनच्या काही शहरांवर ताबा मिळवल्यानंतर आता रशियन सैन्य राजधानी कीववर कब्जा करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे कीव शहराचा धोका वाढला आहे. याच दरम्यान काही सॅटेलाइट फोटो समोर आले आहेत. ज्यातून यूक्रेनच्या रस्त्यांवर ६४ किमी. लांब रशियन सैन्याचा ताफा दिसत आहे.
सॅटेलाइट फोटोमुळे रशियानं आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून येतंय. यूक्रेनची राजधानी कीववर अखेरचा मोठा हल्ला करण्याच्या तयारीत रशिया आहे. अमेरिकन सॅटेलाइट इमेजिंग कंपनी मॅक्सार टेक्नोलॉजीनं सोमवारी हे फोटो शेअर केलेत. मागील ३ दिवसांपासून रशियाचे सैन्य यूक्रेनची राजधानी कीव मिळवण्यासाठी हल्ला करत आहेत. परंतु यूक्रेनच्या सैन्यानं शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे आता रशियाच्या सैन्याची संख्या वाढवून मोठा हल्ला घडवण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या ताफ्यात रशियन सैन्य, हत्यारं आणि अत्याधुनिक वाहनंही समाविष्ट आहेत.
सॅटेलाइट फोटोवरुन खुलासा
सॅटेलाइट फोटोवरुन खुलासा झालाय की, रशियन सैन्याचा ताफा एंटोनोव एअरपोर्टजवळ आहे. जे राजधानी कीवपासून १८ मैल असलेल्या प्रिबिर्स्क शहराच्या रस्त्यांवर पसरला आहे. मॅक्सारनं सांगितले की, रस्त्यांवर ही वाहनं काही काही अंतरावर आहेत. तर सैन्य उपकरणं आणि यूनिटचे २-३ वाहनं उभी आहेत. ज्या रस्त्यांवर हा ताफा आहे त्याजवळील इवानकीवच्या उत्तर पश्चिम आणि उत्तरेकडे काही घरांना आणि इमारतींना आग लागल्याचं दिसून येते.
मॅक्सारच्या या सॅटेलाइट फोटो यूक्रेनसह सीमेच्या उत्तरेकडे २० मैलापेक्षा कमी अंतरावर दक्षिणी बेलारुसनं अतिरिक्त लष्करी दल, हॅलिकॉप्टर यूनिट्सही तैनात केल्याचं दिसून येते. गुरुवारी रशियाच्या आक्रमक हल्ल्यानंतर यूक्रेनी सैनिकांनी राजधानीच्या चहुबाजूने सुरक्षेचं कवच निर्माण केले आहे. त्यामुळे रशियाच्या सैन्याला प्रतिहल्ला सहन करावा लागत आहे. त्यामुळे रशिया कीववर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. जेणेकरून तात्काळ राजधानी ताब्यात घेऊन सत्तांतर केले जाईल.
पुतिन यांनी दिलं २ मार्च टार्गेट
यूक्रेनवरील हल्ल्याचा शेवट २ मार्चपर्यंत झाला पाहिजे असा आदेश पुतिन यांनी रशियन सैन्याला दिले आहेत. बुधवारपर्यंत म्हणजे पुढील २४ तासांत रशियानं हे युद्ध जिंकणं टार्गेट आहे याबाबतची माहिती रशियाचे परराष्ट्र मंत्री आंद्रेई फेडोरोव यांनी दिली आहे.