Russia Ukraine War: धक्कादायक! युक्रेनमध्ये रस्त्यांत सापडले मृतदेह; युद्धाचं भीषण वास्तव आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 09:35 AM2022-04-04T09:35:40+5:302022-04-04T09:40:31+5:30
रशियाच्या सैनिकांनी युक्रेनमधील बुका या भागामध्ये काही जणांचे हात बांधून व त्यांच्या डोक्यात गोळ्या मारून हत्या केली.
कीव्ह : युक्रेनमध्ये रशियाच्या सैनिकांनी केलेल्या भीषण अत्याचारांची उदाहरणे आता समोर येऊ लागली आहे. या युद्धाच्या ३९ व्या दिवशी युक्रेनने असा आरोप केला की, रशियाच्या सैनिकांनी युक्रेनमधील बुका या भागामध्ये काही जणांचे हात बांधून व त्यांच्या डोक्यात गोळ्या मारून हत्या केली. अनेकांचे मृतदेह रस्त्यांमध्ये फेकून देण्यात आले. या आरोपांबाबत रशियाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
कीव्हच्या बुका, इप्रिन, होस्टोमेल या उपनगरांमधून रशियाचे सैन्य माघारी गेल्यानंतर ती सारी ठिकाणे युक्रेनच्या सैनिकांनी ताब्यात घेतली आहे. या परिसरात रशियाच्या सैनिकांनी हत्याकांडे केल्यानंतर ते मृतदेह रस्त्यांत किंवा इमारतींच्या आडोशाला फेकून दिल्याचे आढळून आले. बुका येथे व इतर ठिकाणी रस्त्यांवर टाकून दिलेल्या युक्रेन नागरिकांच्या मृतदेहांचे व्हिडीओ सोशल मीडियावर झळकले आहेत.
एएफपी या वृत्तसंस्थेला माहिती देताना महापौर अनातोला फेझोरुक यांनी सांगितले की, रशियन सैन्याने बाह बुका शहर ताब्यात घेतले आहे. आम्ही आधीच २८० लोकांना सामूहिक कबरीत दफन केले आहे. ते म्हणाले की, रशियन आक्रमणात बूका शहराचा मोठ्या प्रमाणात नाश झाला आहे. रस्त्यावर सर्वत्र मृतदेह विखुरलेले आहेत.
आणखी निर्बंध लादा- युक्रेन
रशियाच्या लष्कराने केलेल्या अनन्वित अत्याचारांचे पुरावे आता जगासमोर आले आहेत. त्यामुळे रशियावर आणखी कडक निर्बंध लादावे, अशी मागणी युक्रेनने केली आहे. अमेरिका व पाश्चिमात्य देशांनी याआधी रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. मात्र, तरीही युक्रेनशी युद्ध थांबविण्यास रशिया तयार नाही.
रशियाकडून नैसर्गिक वायूची खरेदी बंद-
लिथुआनिया या देशाने रशियाकडे नैसर्गिक वायू खरेदी करणे बंद केले असून हा निर्णय या महिन्याच्या प्रारंभापासून लागू झाला आहे. असा निर्णय घेणारा हा युरोपातील पहिला देश आहे. युरोपीय समुदायातील अन्य देशांनीही आपले अनुकरण करावे, असे लिथुआनियाने म्हटले आहे. रशियाने युक्रेनवर हल्ले सुरू केल्याने युरोपातील अनेक देशांनी रशियावर नाराजी व्यक्त केली आहे.