रशियन-युक्रेन युद्धाचा आज 21 वा दिवस आहे. याच दरम्यान युक्रेनमध्ये दर मिनिटाला 55 मुलं निर्वासित होत असल्याचं युनिसेफने म्हटलं आहे. म्हणजेच युद्ध सुरू झाल्यानंतर प्रत्येक सेकंदाला एक मूल निर्वासित होत आहे. आतापर्यंत 75,000 मुले निर्वासित झाल्याचा अंदाज आहे. या युद्धाचा लहान मुलांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. तसेच युद्धात दररोज 5 निष्पाप मुलांना आपला जीव गमवावा लागत आहे. युक्रेनमधील धक्कादायक वास्तव आता समोर आलं आहे. युक्रेनच्या अभियोजक जनरलच्या कार्यालयाने टेलिग्रामवरील एका पोस्टमध्ये कीव्ह, खार्किव्ह, डोनेटस्क, चेर्निहाइव्ह, सुमी, खेरसॉन, मायकोलायव्ह आणि झायटॉमिर प्रदेशात मुलांवर सर्वाधिक परिणाम झाल्याचं म्हटलं आहे.
दररोज किमान पाच लहान मुलांचा आगीमुळे मृत्यू होत आहे. बॉम्बहल्ला आणि गोळीबारात 400 हून अधिक शैक्षणिक संस्थांचे आधीच नुकसान झाले आहे, त्यापैकी 59 पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. डोनेट्स्क-119, खार्किव्ह-50, मायकोलायव-30, सुमी-28, कीव्ह-35, खेरसॉन-21 आणि कीव्ह शहरातील 24 संस्था नष्ट झाल्या आहेत. 11 आरोग्य सुविधा आणि तीन पुनर्वसन केंद्रांवर गोळीबार करण्यात आला. काळजात चर्र करणाऱ्या अनेक घटना या समोर आल्या आहेत. युक्रेनने अनेक प्रमुख शहरांमध्ये रशियन सैन्याच्या हवाई हल्ल्यांबाबत अलर्ट जारी केला आहे.
ज्या शहरांमध्ये अलर्ट सायरन वाजला आहे ती शहरे म्हणजे चर्कासी, निप्रो, ल्विव्ह, कीव्ह, इव्हानो-फ्रँकीव्हस्क, ओडेसा, विनित्साया, किरोवोह्राड आणि खमेलनित्स्की ओब्लास्ट्स तसेच कीव्ह, इझियम, क्रेमेनचुक, बिला त्सेरकवा, निकोपोल, मायकोलायव्ह आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. रशियाने मारिओपोलचे रुग्णालय ताब्यात घेतले असून तब्बल 400 जणांना ओलीस ठेवले असल्याचा दावा युक्रेनने केला आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यात दोन दिवसांपासून सुरू असलेली चर्चा सुरू राहणार आहे. दोन्ही देशांचे प्रतिनिधी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चेत भेटतील.
भयंकर! रशियाने मारिओपोलचे रुग्णालय घेतलं ताब्यात; तब्बल 400 जणांना ठेवलं ओलीस
रशियाने मारियुपोलमधील सर्वात मोठं रुग्णालय ताब्यात घेतलं आहे आणि जवळपास 400 लोकांना ओलीस ठेवले आहे. रशियन सैन्याने डॉक्टर आणि रुग्णांसह 400 लोकांना ओलीस ठेवले होते आणि त्यांना बाहेर जाण्याची परवानगी दिली जात नसल्याची माहिती समोर आली आहे. रशिया युक्रेनच्या शहरांवर सातत्याने बॉम्बफेक करत आहे. या हल्ल्यामुळे अनेक शहरं उद्ध्वस्त होत आहेत. हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. युक्रेन नाटोमध्ये सहभागी होणार नाही हे देशातील जनतेनं स्वीकारायला हवं, असं जेलेन्स्की म्हणाले आहेत. रशियन वृत्तसंस्था स्पुटनिक याबद्दलचं वृत्त दिलं आहे.