रशियाने युक्रेनवर हल्ला करताच अमेरिकेने नाकाबंदी करण्यास सुरुवात केली. रशियावर व्यापारी, तंत्रज्ञान आदी गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले आहेत. यावर रशियाची स्पेस एजन्सी रॉसकोमोसचे प्रमुख दिमित्रि रोगोजिन यांनी अमेरिकेला थेट प्रश्न केला आहे. आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन रशियावरून जात नाही, मग ते भारत किंवा चीनवर पाडायचे का? असा सवाल केल्याने नासाला आता पुढे यावे लागले आहे.
व्लादिमीर पुतीन यांना जर वेळीच रोखले नाही तर त्यांची हिंमत वाढेल आणि ते अन्य देशांवर हल्ले करतील. जर नाटोच्या देशांवर रशियाने हल्ले केले तर अमेरिका त्याला प्रत्यूत्तर देईल, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दिला आहे. तसेच रशियावर तंत्रज्ञान हस्तांतरणासह व्यापार, उद्योग आदींवर कठोर निर्बंध लादले आहेत. परंतू यावर रशियाने एका प्रश्नातच अमेरिकेला गारद केले आहे.
अंतराळात जे अंतराळवीर जातात त्यांना प्रशिक्षण देणे, तंत्रज्ञान निर्माण करणे आदी कामे रशिया आणि अमेरिका एकत्र मिळून करते. यासाठी दोन्ही देशांत करार झालेला आहे. आता अमेरिकेने निर्बंध लादलेत तर मग आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनची सुरक्षा कोण करणार. ते अमेरिकेवर किंवा युरोपवर पडण्यापासून कोण वाचवेल? की हे ५०० टनांचे स्पेस स्टेशन भारत, चीनवर पाडायचा पर्याय आहे, कारण ते रशियावरून जात नाही, असा सवाल रशियाने ट्विटद्वारे उपस्थित केला.
यावर हादरलेल्या नासाने अमेरिकेने लादलेले निर्बंध अंतराळ मोहिमेवर लागू असणार नाहीत अशी सारवासारव केली. तसेच रशिया आणि अमेरिकेने हाती घेतलेली मोहिम अशीच सुरु राहिल, असेही नासाने म्हटले.