युक्रेनवर हल्ला केल्याचा परिणाम म्हणून रशियावर निर्बंधांची कारवाई करण्यात आली आहे. जर्मनीने एकीकडे रशियाच्या अब्जाधीशाची जगातील सर्वात मोठी यॉट जप्त केली आहे. तर दुसरीकडे जगभरातील कंपन्या रशियाच्या बाजारातून एक्झिट घेऊ लागल्या आहेत. जगप्रसिद्ध कंपनी अॅपल, फोर्डने रशियात विक्री बंद केलेली असताना आता अन्य कंपन्यांनी देखील त्यांच्या पावलावर पाऊल टाकत व्यापार थांबविण्यास सुरुवात केली आहे.
आता रशिया आणि बेलारुस दारुच्या थेंबा थेंबासाठी देखील तरसण्याची शक्यता आहे. जगातील सर्वात मोठ्या ब्रँडपैकी एक असलेल्या डियाजियो या मद्यनिर्माता कंपनीने रशियाला दारुचा पुरवठा रोखला आहे. डियाजियो (Diageo) ही कंपनी जॉनी वॉकर, कॅप्टन मॉर्गन, गिनीज, स्मिरनॉफ, व्हाइट हॉर्स सारखे मद्याचे ब्रँड बनविते. याचबरोबर जगातील सर्वात मोठा फर्निचर ब्रँड असलेल्या आयकियाने देखील रशिया आणि बेलारुसमध्ये आपले काम बंद केले आहे.
इंगका ग्रुप (Ingka Group) हा आयकियाचा मालक आहे. कंपनीने म्हटले की, युद्धाचा मानवी जीवनावर गंभीर परिणाम होत आहे. युद्धामुळे व्यापारामध्ये मोठा व्यत्यय येत आहे. यामुळे रशियातील IKEA चा पुरवठा तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. रशिया ही आयकियाची जगातील १० वी सर्वात मोठी बाजारपेठ आहे.
रशियाच्या नेक्स्टा टीव्हीनुसार डियाजिओने रशियाला होणारा दारूचा पुरवठा बंद केला आहे. अनेक देशांनी रशियावर यापूर्वीच निर्बंध लादले असताना डियाजिओने हा निर्णय घेतला आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर इतर अनेक कंपन्यांनी आपला पुरवठा थांबवला आहे.