Russia-Ukraine War: अवघ्या 24 तासांत दोन रशियन अब्जाधीशांचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांयेही मृतदेह सापडले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 10:04 AM2022-04-26T10:04:08+5:302022-04-26T10:04:33+5:30
Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धादरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दोन रशियन अब्जाधीश व्यावसायिकांचा त्यांच्या कुटुंबीयांसह संशयास्पद मृत्यू झाला आहे.
Russia-Ukraine War:रशियामध्ये अवघ्या 24 तासांत दोन अब्जाधीश उद्योगपतींचा (रशियन ऑलिगार्क्स) कुटुंबासह संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आता ही हत्या आहे की आत्महत्या, याचा तपास पोलीस घेत आहेत. युक्रेनवर रशियन हल्ल्यानंतर रशियन नागरिकांविरोधातही नाराजी वाढली आहे. याशिवाय अमेरिकेसह अनेक देशांनी रशियन व्यापाऱ्यांवर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे या मृत्यूंचा याच्याशी संबंध असण्याची शक्यता आहे.
शरीरावर गोळ्यांच्या खुणा
मीडिया रिपोर्टनुसार, बँकिंग क्षेत्रातील अब्जाधीश व्लादिस्लाव अवायेव, त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी यांचे मृतदेह सोमवारी रशियाची राजधानी मॉस्कोमधील त्यांच्या फ्लॅटमध्ये सापडले. त्यांच्या शरीरावर गोळ्या लागल्याच्या खुणा आहेत. याशिवाय आणखी एक व्यावसायिक सर्गेई प्रोटोसेनिया आणि त्यांच्या पत्नीचा मृतदेह स्पेनमध्ये सापडला आहे. अवघ्या 24 तासांच्या कालावधीत दोन रशियन अब्जाधीशांच्या संशयास्पद मृत्यूमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
घरात सापडला मृतदेह
रशियाची खाजगी बँक गॅझप्रॉमचे माजी उपाध्यक्ष व्लादिस्लाव अवायेव यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास आत्महत्येच्या अँगलने केला जात आहे. पोलिसांना असं वाटत आहे की, अवायेवने आधी पत्नी आणि मुलीला मारले, नंतर स्वतःवर गोळी झाडली. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी स्पेनमधूनही अशीच बातमी समोर आली आहे. येथील रशियन अब्जाधीश सर्गेई प्रोटोसेनियाचा मृतदेह त्यांच्या घरात सापडला आहे.
घरातून चाकू आणि कुऱ्हाड जप्त
स्पॅनिश मीडियानुसार, प्रोटोसेनियाचा मृतदेह त्याच्या घरात लटकलेला होता. तर पत्नी व मुलीच्या अंगावर चाकूने वार केल्याच्या खुणा आहेत. पोलिसांनी घरातून एक चाकू आणि कुऱ्हाडही जप्त केली आहे. या अब्जाधीशाने कुटुंबाची हत्या केल्यानंतर आत्महत्या केल्याचेही स्पॅनिश पोलिसांचे मत आहे. मात्र, पोलीस सर्व बाजू लक्षात घेऊन तपास करत आहेत.