कीव – गेल्या ५ दिवसांपासून रशिया-यूक्रेन युद्ध सुरू आहे. या युद्धात अनेक सैनिक आणि सर्वसामान्य लोकंही मारले गेलेत. यूक्रेनची राजधानी कीववर कब्जा करण्यासाठी रशियाच्या सैन्याने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सातत्याने गोळीबार, बॉम्बहल्ले, मिसाइल हल्ले केले जात आहेत. मात्र बलाढ्य रशियासमोर यूक्रेनही झुकण्यास तयार नाही. यूक्रेनचं सैन्यही रशियाच्या लष्कराचं मोठं नुकसान करत आहेत.
त्यातच आता यूक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्री कुलेबा(Dmytro kuleba) यांनी रशियाच्या हल्ल्यात जगातील सर्वात मोठं विमान एंटोनोव २२५ मिरिया(Antonov 225 Mriya) नष्ट झाल्याचा दावा केला आहे. या विमानाला यूक्रेनमध्ये द ड्रीम म्हटलं जायचं. हे विमान यूक्रेनी एयरोनॉटिक्स कंपनी एंटोनोव यांनी तयार केले होते. जगातील सर्वात मोठं कार्गो विमान म्हणून ते ओळखलं जायचं. रशियाच्या हल्ल्यात करण्यात येत असलेल्या गोळीबारामुळे कीवच्या होस्टोमेल हवाई विमानतळावर या विमानाला आग लागली आहे.
परराष्ट्र मंत्र्यांनी ट्विट करुन म्हटलंय की, जगातील सर्वात मोठं विमान मिरिया द ड्रीम कीवच्या जवळील विमानतळावर रशियाच्या सैन्याकडून नष्ट करण्यात आले आहे. आम्ही या विमानाचं पुनर्निमाण करू, आम्ही एक मजबूत, स्वतंत्र्य आणि लोकशाहीवादी यूक्रेन राष्ट्राचं स्वप्न साकार करू. यूक्रेनच्या ट्विटर हँडलवरुन याबाबत ट्विट करत विमानाचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. आमचं सर्वात मोठं विमान जाळलं परंतु आमचं स्वप्न कधीही नष्ट होणार नाही असं त्यांनी सांगितले आहे.
काय आहे या विमानाचं वैशिष्टे?
यूक्रेनच्या या विमानाचं वैशिष्टे म्हणजे हे विमान विना रिफ्यूलिंग १८ तास विना थांबता उड्डाण करू शकतं. हे कार्गो प्लेन ६०० टन वजनाचं आहे. एकाचवेळी ६४० टनापर्यंत वजन घेऊन जाण्यास सक्षम आहे. या विमानात ११७ टन वजनाचं इलेक्ट्रिक जनरेटर आहे. हे जगातील एकमेव विमान होतं ज्यात विंग एरिया बोइंग ७४७ प्लेनच्या तुलनेत दुप्पट होता. अनेक वर्ष या विमानाचा वापर सोवियत आर्मीद्वारे करण्यात येत होते. परंतु मालवाहतूक नियंत्रण यूक्रेनच्या एंटोनोव एअरलाईन्सद्वारे केले जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, मिरिया बनवण्यासाठी जवळपास ३ बिलियन डॉलरहून अधिक खर्च झाला होता. त्याचसोबत या विमानाच्या निर्मितीसाठी ५ वर्ष लागली होती.