Russia Ukraine War: युद्धात रशियन सैन्याला सळो की पळो करणाऱ्या युक्रेनच्या त्या बहादूर वैमानिकाला अखेर वीरमरण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2022 12:41 PM2022-05-01T12:41:28+5:302022-05-01T12:43:48+5:30
Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात रशियन सैन्याची दाणादाण उडवणारा एक वैमानिक घोस्ट ऑफ किव्ह नावाने प्रसिद्धीस आला होता. त्याने एकट्याने युद्धात रशियाची ४० हून अधिक विमाने पाडली होती.
किव्ह - फेब्रुवारी महिन्यात हल्ला केल्यानंतर आता सव्वा दोन महिने होत आले तरी रशियाला युक्रेनप कब्जा मिळवता आलेला नाही. बलाढ्य रशियाच्या आक्रमणाला युक्रेनच्या सैन्याने चिवट प्रतिकार करत थोपवून धरले होते. यामध्ये रशियन सैन्याची दाणादाण उडवणारा एक वैमानिक घोस्ट ऑफ किव्ह नावाने प्रसिद्धीस आला होता. त्याने एकट्याने युद्धात रशियाची ४० हून अधिक विमाने पाडली होती. दरम्यान, युद्धात या वैमानिकाला वीरमरण आलं असून, द लंडन टाइम्स ऑफ लंडनने त्याची ओळख समोर आणल्याचा दावा केला आहे. या वैमानिकाचं नाव मेजर स्टीफन ताराबल्का होतं. त्यांनी २९ वर्षांच्या जीवनात असे काही शौर्य करून दाखवले की, ज्यामुळे त्यांना युक्रेनमधील शौर्याचा सर्वोच्च सन्मान आणि हीरो ऑफ युक्रेन या पदवीने मरणोत्तर सन्मानित करण्यात आले.
घोस्ट ऑफ किव्ह किंवा किव्हचं भूत या नावाने चर्चित या पायलटने युद्धापूर्वीच रशियाच्या १० लढाऊ विमानांच्या चिंधड्या उडवल्या होत्या. त्यानंतर जगभरात त्याची चर्चा झाली होती. द टाइम्सच्या वृत्तानुसार मेजर स्टीफन पश्चिम युक्रेनमधील एका छोट्याशा गावात जन्मले होते. त्यांचं कुटुंब व्यावसायिक होतं. मात्र स्टीफन यांनी लगानपणापासूनच वैमानिक होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. त्यांनी ते स्वप्न साकार केलं आणि आता युद्धात मोठा पराक्रम गाजवला.
रशिया आणि युक्रेनमधील युद्धात मेजर स्टीफन यांनी मिग-२९ विमान उडवून शत्रूचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. युद्ध सुरू होताच त्यांनी रशियाच्या हवाई दलाची १० लढाऊ विमाने उद्ध्वस्त केली. रशियासारख्या बलाढ्य सैन्याला एका सैनिकाने हादरवल्यामुळे युक्रेनच्या सैन्यदलाचा आत्मविश्वास दुणावला होता. मेजस स्टीफन हे १३ मार्च रोजी पुन्हा एकदा रशियन विमानांची शिकार करण्यासाठी गेले असताना शत्रूच्या विमानांनी त्यांना चहुबाजूंनी घेरले. त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यात त्यांना वीरमरण आले.