Russia-Ukraine War:...तर रशिया १०० वर्ष मागे जाईल; यूक्रेन युद्धादरम्यान रशियन उद्योगपतीचा पुतिन यांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 08:57 AM2022-03-13T08:57:08+5:302022-03-13T08:58:23+5:30
रशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्तीनं राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (Valdimir Putin) यांना देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करत सल्ला दिला आहे.
मॉस्को – रशिया-यूक्रेन यांच्यातील युद्धाचा १८ वा दिवस असून अद्यापही रशियाला यूक्रेनचा ताबा मिळवणं शक्य झालं नाही. यूक्रेनची राजधानी कीव्हवर सातत्याने बॉम्बहल्ले होत आहेत. अनेक इमारती उद्ध्वस्त होत आहेत. परंतु यूक्रेन बलाढ्य रशियासमोर झुकण्यास तयार नाही. यातच यूक्रेनवर हल्ला केल्यानं अमेरिकेसह पाश्चात्य देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे एकीकडे युद्धात रशियाला मोठी हानी होतेय तर दुसरीकडे देशातच आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहेत.
रशियाला होणाऱ्या आर्थिक नुकसानीचा फटका तेथील नागरिकांना बसत आहे. यातच सोवियत संघाचं विघटन झालं तेव्हा रशियाचे महत्त्व टिकवून ठेवण्यात व्लादिमीर पोटॅनिन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. रशियाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी पोटॅनिन यांच्या निर्णयांनी मोठा हातभार लावला. ब्लूमबर्ग आणि फोर्ब्सच्या अहवालानुसार, ते रशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. आता त्याच पोटॅनिनने राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (Valdimir Putin) यांना देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करत सल्ला दिला आहे.
युक्रेनवरील हल्ल्याबद्दल इशारा
युक्रेनवरील हल्ल्यानंतर अनेक कंपन्यांनी एकतर रशिया सोडला आहे किंवा देश सोडण्याची घोषणा केली आहे. त्या कंपन्यांच्या मालमत्ता जप्त केल्या जात आहेत. आता रशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपतीने पुतीन यांना याबाबत इशारा देताना म्हटले आहे की, अशा प्रकारे देश १०० वर्षांहून अधिक मागे जाईल. CNN मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, जर रशियाने पाश्चात्य कंपन्या आणि गुंतवणूकदारांसाठी दरवाजे बंद केले तर रशियावर पुन्हा १९१७ क्रांती काळातील संकट पुन्हा येण्याचा धोका आहे असा इशारा मेटल उद्योगातील दिग्गज नोरिल्स्क निकेल (NILSY) चे अध्यक्ष आणि सर्वात मोठे भागधारक व्लादिमीर पोटॅनिन यांनी दिला. तसेच रशियन सरकारला मालमत्ता जप्त करण्याबाबत अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले.
रशियन वृत्तपत्र इज्वेस्टियाने दिलेल्या वृत्तानुसार, रशियाच्या ग्राहक हक्क संघटनेने रशिया सोडण्याचा निर्णय घेतलेल्या कंपन्यांची यादी तयार केली आहे. या यादीमध्ये फोक्सवॅगन, ऍपल(Apple), आयकेईए, मायक्रोसॉफ्ट, आयबीएम, शेल, मॅकडोनाल्ड, पोर्श, टोयोटा, एच अँड एम इत्यादी ५९ कंपन्यांचा समावेश आहे. हे अधिक ब्रँडसह अपडेट केले जाऊ शकते. अशा स्थितीत आपल्या देशातील दिग्गज आणि अनुभवी उद्योगपतीच्या इशाऱ्यांची पुतिन कितपत दखल घेतील या प्रश्नाचे उत्तर कोणालाच ठाऊक नाही.