दोन शहरांमधून लोकांना बाहेर पडण्याची संधी देत रशियाने सात तासांची शस्त्रसंधी जाहीर केली होती. त्यानंतर पुन्हा युक्रेनवर जोरदार हल्ले सुरु झाले आहेत. याच दरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अवघ्या युरोपला उघड धमकी दिली आहे. जर युक्रेनचे आकाश नो फ्लाय झोन म्हणून घोषित केले तर रशिया युरोपवर हल्ला करेल, असा थेट इशाराच दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
रशिया-युक्रेन युद्धाचा आज अकरावा दिवस आहे. युक्रेनमध्ये नो फ्लाय झोन घोषित करण्याची मागणी होऊ लागली होती. त्यावर नाटो आणि अमेरिकेने असे करण्यास नकार दिला होता. यावरून राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनवर (नाटो) कडाडून टीका केली आहे. तसं न करता आता पाश्चात्य लष्करी आघाडीने रशियन हल्ल्यांना ग्रीन सिग्नल दिला असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
यानंतर रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी युरोपवरच हल्ला करण्याची धमकी दिली आहे. युक्रेनमध्ये No Fly Zone ची घोषणा म्हणजे युद्धाची घोषणा समजली जाईल, असे पुतीन म्हणाले. जर ते हेच करत राहिले तर भविष्यात युक्रेनचा स्वतंत्र देश असण्याचा दर्जा धोक्यात येईल. आमच्यावर जे प्रतिबंध लावण्यात आले आहेत ते युद्धाची घोषणा केल्यासारखेच आहेत, असेही पुतीन म्हणाले.
नाटोने रशियाकडून होणारे हल्ले रोखण्यासाठी नो-फ्लाय झोन सुरू करण्याची युक्रेनची विनंती नाकारली. मात्र, पाश्चिमात्य देशांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना युद्ध न थांबविल्यास त्यांच्यावर नवीन निर्बंध घालण्याचा इशाराही दिला आहे. लष्करी आघाडी युक्रेनमध्ये 'नो फ्लाय झोन' लागू करणार नाही. अशा निर्णयामुळे अण्वस्त्र असलेल्या रशियासोबत युरोपात एक मोठं युद्ध सुरू होऊ शकतं. यामध्ये अनेक देश सामील होतील आणि मोठी समस्या निर्माण होईल, असं नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग म्हणाले.
अमेरिकेकडूनही नाटोची बाजूअमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनीही नाटोची बाजू घेतली आणि युक्रेनवर नो-फ्लाय झोनची मागणी नाकारली. नो-फ्लाय झोन म्हणजे रशियन विमाने पाडण्यासाठी नाटोची विमानं युक्रेनियन हवाई क्षेत्रात पाठवावी लागतील. यामुळे युरोपमध्ये भयंकर युद्ध होऊ शकतं, असं ते म्हणाले.