Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज सातवा दिवस आहे. दिवसेंदिवस युद्ध अधिक तीव्र होत असून रशियाकडून युक्रेनच्या खारकीव्ह आणि कीववर जोरदार हल्ले सुरू आहेत. यात अनेकांना आपला जीव गमावावा लागत आहे. तसंच दोन्ही देशांचं मोठं नुकसान देखील होत आहे. युक्रेन विरोधात युद्ध पुकारल्यामुळे पाश्चिमात्य देशांकडून रशियाविरोधात आर्थिक निर्बंध लादण्याची कारवाई केली जात असतानाही रशियानं मात्र आपल्या भूमिकेत बदल केलेला नाही. याउलट रशियानं युद्धाची कारवाई आणखी तीव्र करत कीव शहरावर जोरदार हल्ला चढविण्यास सुरुवात केली आहे. यातच आता रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी तिसऱ्या महायुद्धाची उघड धमकीच दिली आहे.
"तिसरं महायुद्ध झालं तर ते अण्वस्त्र हल्ल्याचं आणि विनाशकारी युद्ध ठरेल", असं वक्तव्य करत रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जेई लावारोव्ह यांनी आपले मनसुबे स्पष्ट केले आहेत. रशियातील एका सरकारी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केल्याची माहिती समोर आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनंही यासंदर्भातील ट्विट करत वृत्ताला दुजोरा दिला आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या आडून राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी जगाला संकेत दिले असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे रशिया-युक्रेन युद्ध आता आणखी चिघळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, आज युक्रेन आणि रशिया यांच्यात दुसऱ्यांचा बैठक होणार आहे. या बैठकीत तोडगा निघणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियानं युक्रेनवर हल्ला करुन खूप मोठी चूक केली असल्याचं विधान करत रशियावर जोरदार हल्ला चढवला आहे. अमेरिकेच्या हवाई हद्दीत रशियाच्या सर्व विमानांच्या प्रवासाला बंदी घालण्याचा मोठा निर्णय बायडन यांनी आज जाहीर केला आहे. तसंच युक्रेनला रशिया विरुद्धच्या युद्धात सैनिकी स्वरुपात मदत करता येत नसली तरी नाटोतील सदस्य देशांच्या सुरक्षेसाठी कटीबद्ध असल्याचं बायडन म्हणाले. नाटोतील सदस्य देशांमध्ये अमेरिकेचे हवाई, नौदल आणि लष्करी दल पूर्णपणे सज्ज असल्याचं सांगत त्यांना रशियाला थेट इशारा दिला आहे.