तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला! बायडन यांच्या वक्तव्यानं रशियाचा संताप, अमेरिकन राजदूताला बोलावणं धाडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 10:41 PM2022-03-21T22:41:25+5:302022-03-21T22:41:57+5:30
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अजूनही सुरूच आहे. युक्रेनवरील हल्ल्यामुळे देशातील कीव्ह, खारकिव्ह आणि मारियूपोल शहरांमध्ये नुसते उद्ध्वस्त झालेल्या इमारतींचे ढिगारेच्या ढिगारे पाहायला मिळत आहेत.
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अजूनही सुरूच आहे. युक्रेनवरील हल्ल्यामुळे देशातील कीव्ह, खारकिव्ह आणि मारियूपोल शहरांमध्ये नुसते उद्ध्वस्त झालेल्या इमारतींचे ढिगारेच्या ढिगारे पाहायला मिळत आहेत. याचवेळी सर्वात मोठा प्रश्न हा आहे की रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा अंतिम परिणाम काय होईल? दरम्यान, अमेरिका आणि रशिया यांच्यातील संबंधही बिघडले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्याबाबत रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या राजदूताला बोलावणं धाडलं आहे. बायडन यांच्यामुळे रशिया-अमेरिका संबंध तुटण्याच्या मार्गावर असल्याचं रशियाकडून सांगण्यात आलं आहे.
युद्धाला 26 दिवस झाले आहेत आणि युक्रेनवर कब्जा करण्यासाठी रशियन सैन्यानं आता हायपरसॉनिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे रशियन सैन्याची आक्रमकता दिवसेंदिवस तीव्र होत आहे, तर दुसरीकडे युक्रेनचे अध्यक्ष जेलेन्स्की यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा करण्यास तयार असल्याचं सांगितलं आहे. पुतिन यांच्याशी चर्चेसोबतच जेलेन्स्की यांनी हे संकेतही दिले आहेत की, त्यात अपयश आल्यास तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात होऊ शकते.
इतिहासाची पानं उलटून पाहिली तर पहिलं आणि दुसरं महायुद्ध ज्यामुळे झालं तीच परिस्थिती युक्रेन युद्धादरम्यान निर्माण होत असल्याचं दिसून येत आहे. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेलं युद्ध कोणत्याही क्षणी संपूर्ण जगाला वेठीस धरू शकतं.
संपूर्ण जगाची दोन गटांत विभागणी
युक्रेननं शस्त्र टाकण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे आणि २४ फेब्रुवारीपासून सुरू असलेलं युद्ध अजूनही सुरूच आहे. युक्रेन मोठ्या हिमतीनं रशियाचा सामना करत आहे. सध्याची परिस्थिती पाहिली तर पहिल्या आणि दुसर्या महायुद्धांसारख्या दोन गटात जगाची विभागणी झाली आहे. एकीकडे पाश्चिमात्य देश उघडपणे युक्रेनसह नाटो देशांसोबत आहेत, तर दुसरीकडे रशियाला चीनचा उघड पाठिंबा मिळत आहे. महायुद्धाचा धोका दिवसेंदिवस अधिक वाढत आहे कारण पुतिन आता रिकाम्या हाताने परतायला तयार नाहीत, तर अमेरिकेला कोणत्याही किंमतीवर युक्रेन वाचवायचं आहे. म्हणजेच जग दोन गटात विभागलं गेलं असून येत्या काळात हे दोन गट महायुद्धाचं कारण बनू शकतात.