Russia-Ukraine War: 'टायटॅनिक'च्या अभिनेत्याची युक्रेनला मोठी मदत, पुनर्वसनासाठी दिले 76 कोटी रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 11:52 AM2022-03-08T11:52:45+5:302022-03-08T11:53:24+5:30
लिओनार्डो डी कॅप्रिओचे युक्रेनशी जुने नाते आहे, लिओची आजी युक्रेनमधील ओडेसाची रहिवासी होती.
कीव:युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. मात्र रशियासारख्या प्रचंड देशासमोर युक्रेन पूर्णपणे कोलमडलाय. यातच विविध क्षेत्रातील लोकांसह सेलिब्रिटीही युक्रेनच्या समर्थनार्थ आवाज उठवत आहेत. दरम्यान, हॉलिवूड अभिनेता लिओनार्डो डी कॅप्रिओ (Leonardo Dicaprio) युक्रेनच्या मदतीसाठी पुढे आला आहे.
Leonardo DiCaprio has donated 10 million USD to Ukraine.
— Visegrád 24 (@visegrad24) March 6, 2022
His maternal grandmother was a native of Odessa, Ukraine! pic.twitter.com/7ME5aUAiQu
लिओनार्डो डी कॅप्रिओने 10 मिलीयन अमेरिकन डॉलर्स (भारतीय चलनानुसार 76,88,95,000 कोटी रुपये) दान केले आहेत. त्याची ही आर्थिक मदत युक्रेनला अडचणीच्या काळात मोठी मदत आहे. विशेष म्हणजे लिओनार्डोची आजी युक्रेनमधील ओडेसा येथील होती. अशा परिस्थितीत, त्याचे युक्रेनशी घट्ट नाते आहे.
लिओच्या आईचा जन्म बॉम्ब शेल्टरमध्ये झाला
लिओनार्डोने अनेकदा सांगितले आहे की, तो अर्धा रशियन आहे, त्याचे आजी आजोबा रशियाचे आहेत. काही रिपोर्टमध्ये त्याचे आजी-आजोबा ओडेसाचे, तर काहींच्या मते खेरसनचे होते. ओडेसा आणि खेरसन युक्रेनमधील शहरे आहेत. लिओनार्डोची आई इमरलिन इंडेनबिर्केनचा जन्म एका बॉम्ब शेल्टरमध्ये झाला होता. त्याचे आई-वडील, म्हणजे लिओनार्डोचे आजी-आजोबा रशियन निर्वासित होते. रशिया युद्धभूमीवर उभा होता तेव्हा फेब्रुवारी 1943 ला हवाई हल्ले टाळण्यासाठी इमरलिनचे पालक बॉम्ब शेल्टरमध्ये लपले, तिथेच इमरलिनचा जन्म झाला.
जागतिक बँकेचे युक्रेनला 72 कोटी डॉलर्सचे कर्ज मंजूर
दरम्यान, युक्रेनच्या मदतीसाठी जागतिक बँकेने पुढाकार घेतला आहे. वर्ल्ड बँकेने युक्रेनला 72 कोटी 30 लाख डॉलर्सचे कर्ज मंजूर केले आहे. एकीकडे रशियाने युक्रेनवर हल्ले सुरू केल्यानंतर जगातील विविध देशांनी निर्बंध लादण्यास सुरुवात केली. आर्थिक निर्बंधांसह अनेक गोष्टींवर बंदी आणण्यात आली. अनेक बड्या कंपन्यांनी आपली उत्पादन रशियात विक्री करणार नसल्याचे सांगितले आहे. एकूणच या कृतीमुळे रशियाची कोंडी करण्याचा प्रयत्न अन्य देशांकडून सुरू करण्यात आला आहे.