कीव - यूक्रेननं नाटो संघटनेचे सदस्य होऊ नये यामुळे सुरू झालेल्या रशिया यूक्रेन संघर्षाचं २५ फेब्रुवारीला युद्धात रुपांतर झालं. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी यूक्रेनविरोधात थेट सैन्य कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर रशियन सैन्यानं यूक्रेनच्या सीमेत घुसून बॉम्बहल्ले, मिसाइल अटॅक करण्यास सुरुवात केली. रशियानं आतापर्यंत यूक्रेनमधील अनेक शहरं ताब्यात घेतली. परंतु ९ दिवस होत आले तरीही यूक्रेनची राजधानी कीववर कब्जा करण्यात रशियाला यश आलं नाही.
आता ९ व्या दिवशी यूक्रेनची राजधानी कीवमध्ये रशियन सैन्य घुसले आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाकडून हा दावा करण्यात आला आहे. याबाबत नवीन व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओत रशियन टँक दिसत आहे. रशियाच्या या दाव्यामुळे आता कीववर कब्जा मिळवण्यात बलाढ्य रशियाला जास्त वेळ लागणार नाही. हे युद्ध आणखी वेगाने पुढे जात आहे. कीवच्या बाहेरील परिसरातही रशियन सैन्याची एन्ट्री झाली आहे.
२ दिवसांपूर्वीच यूक्रेनची राजधानी कीव(Kyiv) च्या दिशेने रशियाच्या सैन्याचा ताफा वाढत असल्याचं समोर आलं होतं. रशियाच्या ताफ्याची दृश्य सॅटेलाइन इमेजमध्ये कैद झाली होती. ज्यात ६४ किमी लांब असा रशियन लष्कराचा ताफा दिसत होता. शुक्रवारी रशियानं यूक्रेनच्या जेपेरोजिए न्यूक्लिअर पॉवर प्लांटवर हल्ला केल्यानंतर यूक्रेनचे राष्टपती झेलेंस्की यांनी मोठं विधान केले. न्यूक्लिअर प्लांटमध्ये स्फोट झाल्यास संपूर्ण युरोप उद्ध्वस्त होईल. युरोपनं आता जागायला हवं असं त्यांनी सांगितले.
आपण दोघं बसून बोलूयात'; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केलं आवाहन
एएफपी या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानूसार, युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमीर झेलेंस्की यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांना समोरासमोर बसून चर्चा करण्याचं आवाहन केलं आहे. आम्ही रशियावर हल्ला केलेला नाही. आम्ही हल्ला करण्याची योजनाही बनवत नाहीय. तुम्हाला आमच्याकडून काय हवंय? आमच्या जमीनीवरील ताबा सोडा, असं वोलोडिमीर झेलेंस्की यांनी म्हटलं आहे. तसेच माझ्यासोबत बसा. आपण अगदी एकमेकांपासून ३० मीटरवर (जसे तुम्ही फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत बसला होता तसे) बसून बोलूयात, असं आवाहन देखील झेलेंस्कींनी यांनी पुतिन यांच्याकडे केलं आहे.