Russia Ukraine War: युद्ध थांबवा! तुर्कीच्या राष्ट्रपतींचं पुतिन यांना आवाहन, रशियानं समोर ठेवल्या या 'भयंकर' अटी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 08:43 PM2022-03-06T20:43:08+5:302022-03-06T20:44:10+5:30
तुर्कीच्या राष्ट्रपती कार्यालयाने म्हटले आहे की, एर्दोगन यांनी रशियाच्या राष्ट्रपतींसोबत झालेल्या संभाषणात तत्काळ युद्धविराम करण्याचे आवाहन केले आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या भीषण युद्धाचा परिणाम काय होईल? या विचाराने संपूर्ण जग चिंतित आहे. यातच, युद्धाच्या 11 व्या दिवशी रविवारी तुर्कीचे (Turkey) राष्ट्रपती Recep Tayyip Erdogan यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली.
एर्दोगन यांनी पुतिन यांच्यासोबत तब्बल 1 तास केली चर्चा -
तुर्कीच्या राष्ट्रपती कार्यालयाने म्हटले आहे की, एर्दोगन यांनी रशियाच्या राष्ट्रपतींसोबत झालेल्या संभाषणात तत्काळ युद्धविराम करण्याचे आवाहन केले आहे. सुमारे तासभर चाललेल्या या फोन कॉलमध्ये एर्दोन म्हणाले, युक्रेनमधील मानवी संकट पाहता रशियाने काही काळासाठी युद्ध थांबवायला हवे. तसेच, संघर्ष संपविण्यासाठी युद्धाऐवजी राजकीय तोडगा काढायला हवा, असे आवाहनही एर्दोगन यांनी पुतिन यांना केले आहे.
मध्यस्थ बनण्याची दिली ऑफर -
तुर्कीचे रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांशी चांगले संबंध आहेत. सध्याच्या युद्ध स्थितीत मध्यस्थ बनून शांतता प्रस्थापित करण्याचे श्रेय घेण्याचा तुर्कीचा इरादा आहे. एवढेच नाही, तर त्यांनी पुढील आठवड्यात दोन्ही देशांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी आमंत्रितही केले आहे. तसे यावेळी चर्चेदरम्यान, हे संकट संपविण्यासाठी आपण आपल्या बाजूने सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहोत, असेही एर्दोगन यांनी म्हटले आहे.
पुतिन यांनी सांगितल्या आपल्या अटी -
चर्चेदरम्यान पुतिन यांनी एर्दोगन यांना युद्धविरामासाठी रशियाच्या अटी सांगितल्या. तसेच, जोवर युक्रेन या अटी मान्य करत नाही, तोपर्यंत युद्ध थांबणार नाही, असेही पुतिन यांनी म्हटले आहे. यात, युक्रेनच्या जागतिक घडामोडींपासून तटस्थ रहण्याचा आणि युक्रेनच्या निशस्त्रीकरणाच्या मुद्याचा समावेश आहे. याशिवाय, रशिया आपले लक्ष्य साध्य केल्याशिवाय थांबणार नाही, असेही पुतिन यांनी स्पष्ट केले आहे.