कीव – सध्या जगभरात रशिया-यूक्रेन युद्धाची बरीच चर्चा आहे. रशियानं यूक्रेनवर हल्ला केल्यापासून आतापर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या हालचाली पाहायला मिळाल्या आहेत. गेल्या ६ दिवसांपासून रशिया-यूक्रेन युद्ध सुरू आहे. युद्धाची घोषणा करणाऱ्या रशियावर जगभरातून टीका होत आहे. नाटो(NATO)सह अन्य प्रमुख संघटना या युद्धासाठी रशियाला जबाबदार धरत आहेत. त्याचवेळी सोशल मीडियावर दोन रशियन सैनिकांचा फोटो व्हायरल होत आहे.
यूक्रेनवर हल्ला करण्यासाठी निघालेल्या रशियन सैनिकाच्या एका घोडचुकीमुळे ते यूक्रेनच्या हाती लागलेत. आता हे दोन्ही सैन्य जवानांना यूक्रेननं कैद केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघंही रशियातून यूक्रेनवर हल्ला करण्यासाठी निघाले होते. परंतु त्यांनी गाडीतील पेट्रोल चेक केले नाही. अर्ध्या रस्त्यातच त्यांच्या गाडीतील इंधन संपुष्टात आले. त्यामुळे ते यूक्रेन सैन्याच्या हाती लागले. या दोघांना बंदी बनवून जेलमध्ये टाकलं आहे. परंतु अद्याप हे स्पष्ट नाही की दोघं टँक चालवत होते की, अन्य लढाऊ वाहन? मात्र यूक्रेनच्या सीमेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या गाडीचं पेट्रोल संपलं. त्यानंतर ते स्थानिक पोलिसांकडे मदतीला गेले.
यूक्रेनची राजधानी कीवच्या इंडिपेंडेंट न्यूज आऊलेटनं दोघांचे फोटो शेअर केलेत. त्यात दोघांच्या हातात बेड्या दिसत आहेत. या दोघा रशियन जवानांना अटक करण्यात आली आहे. त्यांना प्रिजनर ऑफ वॉर घोषित केले आहे. त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पेट्रोल संपल्यानंतर ते दोघं वाहनातच अडकले. बाहेरील वातावरणात थंडी असल्याने त्यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे मदतीसाठी ते शत्रूकडे पोहचले. गेल्या गुरुवारी रशियानं यूक्रेनवर हल्ला केला होता.
मागील ६ दिवसांपासून रशिया-यूक्रेन युद्ध(Russia Ukraine War) सुरू आहे. या युद्धात बलाढ्य रशियानं यूक्रेनच्या अनेक शहरांवर ताबा मिळवल्याचं म्हटलं आहे. मात्र यूक्रेनची राजधानी कीववर कब्जा मिळवण्यासाठी रशियन सैन्याची दमछाक होत असल्याचं दिसून येत आहे. एका दिवसांत हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. त्यात लहान मुलांपासून ते महिलांचाही समावेश आहे. परंतु आतापर्यंत रशियानं युद्धात झालेल्या मृत्यूचा आकडा जारी केला नाही. साधारण ही संख्या ५ हजारांपर्यंत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.