युक्रेनच्या नागरिकांनी केक देऊन आणि दारू पाजून मारले रशियन सैनिक; अनेक जण रुग्णालयात! तुमचा विश्वास बसणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 07:32 PM2022-04-03T19:32:47+5:302022-04-03T19:33:47+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून रशियन सैनिक 50 हजार लोकसंख्येच्या इझियमवर बॉम्बिंग करत आहेत.
कीव - गेल्या पाच आठवड्यांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध थांबण्याचे नाव नाही. या दरम्यान दोन्ही देशांमध्ये झालेल्या चर्चेच्या अनेक फेऱ्याही कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकलेल्या नाहीत. रशियन लढाऊ विमाने युक्रेनवर बॉम्बिंग करत आहेत. यातच, एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रशियन सैनिकांना धडा शिकविण्यासाठी युक्रेनमधील नागरिकांनी अत्यंत खतरनाक पद्धत अवलंबली आहे. येथील नागरिकांनी रशियन सैनिकांना केकमधून विष देऊन बदला घेतला आहे.
'द मिरर'ने दिलेल्या वृत्तानुसार, युक्रेनच्या नागरिकांनी रशियन सैनिकांना केक आणि वाईनमधून विष देऊन ठार केले आहे, असा खुलासा खुद्द युक्रेनच्याच गुप्तचर संस्थेने केला आहे. खार्किव्हजवळील इझियममध्ये नागरिक रशियन सैनिकांविरुद्ध लढत आहेत. रशियन सैन्याने या शहराचा मोठा परिसर उद्ध्वस्त केला आहे.
जगण्यासाठी संघर्ष करतायत रशियन सैनिक -
युक्रेनच्या संरक्षण गुप्तचर संचालनालयाने दावा केला आहे, की स्थानिकांनी तिसऱ्या रशियन मोटर रायफल डिव्हिजनसाठी केक बेक केला होता. यात त्यांना विष देण्यात आले. परिणामी, दोन रशियन सैनिकांचा मृत्यू झाला तर 28 जण डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. एवढेच नाही तर, बनावट मद्य प्यायल्याने 500 सैनिक रुग्णालयात दाखल आहेत, असा दावाही केला जात आहे.
रशियन सैनिकांचे सामान्य नागरिकांवर हल्ले -
गेल्या अनेक दिवसांपासून रशियन सैनिक 50 हजार लोकसंख्येच्या इझियमवर बॉम्बिंग करत आहेत. येथील शाळा उद्ध्वस्त झाल्या आहेत, रुग्णालये ओसाड झाली आहेत. या हल्ल्यात अनेक घरेही उद्ध्वस्त झाली आहेत. युक्रेनमधील हृशुवाखा गावातील मायकोला शापोश्निक यांनी स्काय न्यूजला सांगितले की रशियन विमाने अत्यंत कमी उंचीवर उडत आहेत आणि बॉम्बफेक करत आहेत. ते म्हणाले की, रशियन सैनिक सामान्य नागरिकांना लक्ष करत आहेत.