कीव्ह: रशियाचे युक्रेनवरील हल्ले (Russia Ukraine War) सुरूच आहेत. रशिया-युक्रेन युद्धाचा ३० वा दिवस आहे. गेल्या महिन्याभरापासून दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरूच आहे. युक्रेनच्या विविध भागांवर रशियाने केलेल्या भीषण हल्ल्यांमुळे मोठे नुकसान होत आहे. युक्रेनमधील लाखो रहिवासी देश सोडून इतरत्र स्थलांतरित झाले आहेत. अद्यापही रशिया युद्ध थांबवायला तयार नाही. युक्रेनही जोरदार प्रत्युत्तर देत असून, माघार घेण्यास कोणताही देश तयार नाही. यातच आता रशियाला ९ मेपर्यंत युद्ध सुरू ठेवायचे आहे, असा मोठा दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे. या दाव्यामागे एक महत्त्वाचे कारण असल्याचे सांगितले जात आहे.
युक्रेनवर हल्ले सुरू केल्यापासून रशिवायवर अनेकविध देशांनी आर्थिकसह अन्य निर्बंद लादले आहेत. संयुक्त राष्ट्रातही रशियाचे समर्थन करण्यास काही अपवाद वळगता कोणीही तयार नाही. असे असूनही रशिया माघार घ्यायला तयार नाही. आता तर नाटो देशांनी युक्रेनच्या सीमेवर युद्धाभ्यास सुरू केल्यामुळे आता तिसरे महायुद्ध होऊ शकते, अशी दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये काही चर्चेच्या फेऱ्याही पार पडल्या. मात्र, त्यातून काही निष्पन्न झाले नाही. यातच आता युक्रेनच्या गुप्तचर विभागाने रशियाला मे महिन्यापर्यंत युद्ध सुरूच ठेवायचे आहे, असा दावा केला आहे.
नेमके कारण काय?
युक्रेनच्या गुप्तचर संस्थांनी दावा केला आहे, की रशियाला ९ मे पर्यंत युद्ध सुरू ठेवायचे आहे. तर युक्रेनचे काही अधिकारी म्हणतात की, ०९ मे या दिवशी रशियाने दुसऱ्या महायुद्धात नाझींवर विजय मिळवला होता. त्यामुळे ९ मे हा दिवस रशियासाठी अतिशय महत्त्वाचा असून, एखाद्या सणाप्रमाणे तो साजरा केला जातो. दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियाला G20 मधून बाहेर काढावे, अशी इच्छा असल्याचे म्हटले आहे. युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्यावर नाटोच्या आपत्कालीन बैठकीनंतर बायडन यांनी ब्रुसेल्समध्ये हे भाष्य केले. G20 हा १९ देशांचा आणि युरोपियन युनियनचा एक आंतरशासकीय मंच आहे, जो प्रमुख जागतिक समस्यांवर काम करतो.
दरम्यान, युक्रेनमध्ये रशियाच्या हल्ल्यानंतर उद्भवलेल्या मानवतावादी संकटावरील मसुद्याच्या ठरावावर सुरक्षा परिषदेच्या मतदानात भारतासह १३ सदस्य देशांनी भाग घेतला नाही. राजकीय संवाद, वाटाघाटी, मध्यस्थी आणि इतर शांततापूर्ण मार्गांनी रशिया आणि युक्रेन यांच्यात त्वरित शांततापूर्ण तोडगा काढण्याची मागणी या ठरावात करण्यात आली. व्हिटो पॉवरसह स्थायी कौन्सिल सदस्य असलेल्या रशियाने १५ सदस्य राष्ट्रांना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मसुद्याच्या ठरावावर मतदान करण्याचे आवाहन केले होते. मानवतावादी संकट लक्षात घेता महिला आणि लहान मुलांसह असुरक्षित परिस्थितीत राहणाऱ्या नागरिकांना पूर्ण संरक्षण मिळावे, अशी मागणी करण्यात आली होती.