Russia Ukraine War: गेल्या २१ दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. अशातच रशियाच्या आणखी एका बडा अधिकारी यात ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. युक्रेनच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार मेजर जनरल ओलेग मित्येव १५० व्या मोटराइज्ड रायफल डिव्हिजनचे कमांडर होते. या २१ दिवसांच्या कालावधीत रशियाच्या चौथ्या मोठ्या अधिकाऱ्याच्या मृत्यू झाला.
यापूर्वी रशियन लष्कराचे मेजर जनरल विताली गेरासिमोव, रशियाचे मेजर जनरल अँड्री सुखोवेत्स्की आणि रशियन फोर्स हेडक्वार्टरचे डिप्टी चीफ मेजर Andriy Burlakov यांना ठार केल्याचा दावा युक्रेननं केला होता. अँड्रीय रेजिमेंट चीफ ऑफ स्टाफ देखील होते. युद्धादरम्यान, त्यांच्यावर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या. व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला करण्याचा निर्णय घेतल्याने रशियाची अर्थव्यवस्था किमान ३० वर्षे मागे पडेल असं म्हटलं जात आहे. अर्थशास्त्रज्ञ, गुंतवणूकदारांच्या मते, रशियातील राहणीमानाचा दर्जा किमान पुढील पाच वर्षे कमी होईल.
१२ हजार जवानांना ठार केल्याचा दावाया युद्धात रशियाचे मोठे नुकसान केल्याचा दावा सातत्यानं युक्रेनच्या लष्कराकडून करण्यात येत आहे. या युद्धात आतापर्यंत १२ हजारांहून अधिक रशियन सैनिक मारले गेल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर ५७ विमाने, ३५३ टँक, ८३ हेलिकॉप्टरही नष्ट केल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय १२५ तोफा, लष्कराच्या ११६५ वाहनांचेही नुकसान झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
तर दुसरीकडे रशियाच्या वृत्तसंस्थांनी रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार रशियन सैनिकांनी आतापर्यंत युक्रेनी लष्कराचे ३६८७ इन्फ्रास्ट्रक्चर नष्ट केल्याचा दावा केला आहे. तर काही दिवसांपूर्वी युक्रेनी लष्कराच्या ट्रेनिंग सेंटरवर हल्ला करून १८० पेक्षा अधिक जणांना ठार केल्याचाही दावा त्यात करण्यात आला आहे.