16400 रशियन सैनिक मारले; 117 विमाने, 127 हेलिकॉप्टर, 575 टँक नष्ट!, युक्रेनकडून रशियाचे मोठे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 06:13 PM2022-03-26T18:13:35+5:302022-03-26T18:14:27+5:30
Russia Ukraine War : द कीव इंडिपेंडंट या इंग्रजी वृत्तपत्राने 26 मार्चला सकाळी 10 वाजेपर्यंत युक्रेनच्या सैन्याने रशियाचे किती नुकसान केले याची माहिती दिली.
युक्रेन आणि रशिया यांच्यातील भीषण युद्धाला एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. रशिया युक्रेनच्या शहरांना क्षेपणास्त्रे आणि बॉम्बने हादरवत आहे. त्याचबरोबर युक्रेनचे सैन्यही रशियाच्या लष्कराला प्रत्युत्तर देत आहे. द कीव इंडिपेंडंट या इंग्रजी वृत्तपत्राने 26 मार्चला सकाळी 10 वाजेपर्यंत युक्रेनच्या सैन्याने रशियाचे किती नुकसान केले याची माहिती दिली.
द कीव इंडिपेंडंटच्या ट्विटनुसार, युक्रेनने आतापर्यंत 16,400 रशियन सैनिकांना ठार केले आहे. तर 117 विमाने, 127 हेलिकॉप्टर्स, 575 टँक, 293 आर्टिलरी, 1640 लष्करी वाहने, 91 एमएलआरएस आणि 7 बोटी नष्ट करण्यात आल्या आहेत. याशिवाय 56 यूएव्ही, 51 अँटी एअरक्राफ्ट वॉरफेअर, 2 विशेष उपकरणे, 1,131 वाहने, 73 फ्यूल टँकही नष्ट करण्यात आले आहेत.
These are the indicative estimates of Russia’s losses as of March 26, according to the Armed Forces of Ukraine. pic.twitter.com/HPwiDjQqcN
— The Kyiv Independent (@KyivIndependent) March 26, 2022
दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आज वर्सा येथे युक्रेनच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांची भेट घेणार आहेत. व्हाईट हाऊसने ही माहिती दिली आहे. दरम्यान, युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात रशियन सैन्याने आता राजधानी कीवमधून आपले लक्ष हलवले आहे आणि त्याऐवजी युक्रेनच्या पूर्व भागातील डॉनबास औद्योगिक क्षेत्र मुक्त करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, असे अमेरिकन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
युद्धाच्या नव्या टप्प्याची ही सुरुवात असू शकते, असे अमेरिकन अधिकाऱ्यांचे म्हणाले. मात्र, त्याचे काय परिणाम होतील हे सांगणे घाईचे आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या सैन्याला देशाच्या अनेक भागांमध्ये प्रचंड दबावाचा सामना करावा लागत आहे. युनायटेड स्टेट्स आणि इतर देश युक्रेनला शस्त्रास्त्रे आणि उपकरणांचा पुरवठा वाढवत आहेत.