जगातील सर्वात मोठे विमान पुन्हा उड्डाण भरणार? जवळपास 41 अब्ज रुपये खर्च होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 03:16 PM2022-11-10T15:16:12+5:302022-11-10T15:18:16+5:30
Russia Ukraine War: सहा इंजिन असलेल्या या विमानाने डिसेंबर 1988 मध्ये पहिल्यांदा उड्डाण केले होते.
गेल्या काही महिन्यांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. दरम्यान, यावर्षी फेब्रुवारीमध्ये जेव्हा रशियन सैन्याने युक्रेनवर हल्ला केला, तेव्हा सुरुवातीच्या काळातच रशियाने जगातील सर्वात मोठे विमान उद्ध्वस्त केले. आता या विमानाची पुनर्बांधणी करण्याची योजना आखली जात आहे.
सरकारी मालकीच्या अँटोनोव्ह कंपनीने सोमवारी फेसबुकवर पोस्ट केलेल्या निवेदनानुसार, दुसऱ्या अँटोनोव्ह एएन-225 कार्गो विमानाच्या डिझाइनचे काम सुरू केले आहे. हे विमान युक्रेनियनमध्ये मिरिया म्हणून देखील ओळखले जाते. मात्र, रशियाचे युक्रेनमधील युद्ध संपेल तेव्हाच डिटेल्स दिले जातील, असेही अँटोनोव्ह कंपनीने स्पष्ट केले आहे.
कीव्हजवळील हवाई क्षेत्रामध्ये दुरुस्तीदरम्यान फेब्रुवारीमध्ये नष्ट झालेल्या भव्य विमानाच्या पुनर्बांधणीत अनेक अडथळे आहेत. अँटोनोव्हचा असा अंदाज आहे की, 88-मीटर (290-फूट) पंखांच्या विस्ताराची पुनर्बांधणी करण्यासाठी किमान 40,88,87,50,000 रुपये (500 मिलियन डॉलर) खर्च होतील. पण पैसा कुठून आणणार हा मोठा प्रश्न आहे. कारण, रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनची अर्थव्यवस्था अत्यंत वाईट टप्प्यातून जात आहे.
पाच वर्षांपेक्षा जास्त वेळ लागेल
विमान पुनर्संचयित करण्यासाठी पाच वर्षांपेक्षा जास्त वेळ लागेल आणि 3 बिलियनपेक्षा जास्त खर्च येईल, असे अँटोनोव्हची मूळ कंपनी उक्रोबोरोनप्रॉमने सुरुवातीला विमान उद्ध्वस्त झाल्यानंतर सांगितले होते. तसेच, अँटोनोव्हने सांगितले की, तज्ज्ञांच्या मूल्यांकनानंतर मूळ विमानातील सुमारे 30 टक्के घटक नवीन आवृत्ती तयार करण्यासाठी वापरले जाऊ शकतात.
This was the world’s largest aircraft, AN-225 ‘Mriya’ (‘Dream’ in Ukrainian). Russia may have destroyed our ‘Mriya’. But they will never be able to destroy our dream of a strong, free and democratic European state. We shall prevail! pic.twitter.com/TdnBFlj3N8
— Dmytro Kuleba (@DmytroKuleba) February 27, 2022
निधी जमा करण्याची योजना
कंपनी रोख रक्कम जमा करण्यासाठी आणि प्रायोजकांना आकर्षित करण्यासाठी जर्मनीच्या लिपजिंग/हाले विमानतळावर विमानाचे मॉडेल आणि चित्रे यांसारख्या मालाची विक्री करण्याची योजना आखत आहे, असे अँटोनोव्हचे जनरल डायरेक्टर यूजीन गॅव्ह्रिलोव्ह यांच्या हवाल्याने सांगण्यात येत आहे.
डिसेंबर 1988 मध्ये पहिल्यांदा उड्डाण
सहा इंजिन असलेल्या या विमानाने डिसेंबर 1988 मध्ये पहिल्यांदा उड्डाण केले होते. महामारीच्या काळात जगभरात कोविड-19 लसींची वाहतूक करण्यासाठी याचा वापर करण्यात आला. परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा सारख्या राजकीय व्यक्तींनी या विमानाचा रॅलींग पॉइंट म्हणून वापर केला आहे, तर ते राष्ट्रीय स्टॅम्पसारख्या वस्तूंवर देखील दाखवण्यात आले आहे.