Russia Ukraine War : हृदयद्रावक! आजारी आईला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या महिलेवर रशियन सैनिकांनी झाडल्या गोळ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 03:08 PM2022-03-13T15:08:07+5:302022-03-13T15:28:19+5:30
Russia Ukraine War : आईच्या औषधासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेवर रशियन सैनिकांनी गोळ्या झाडल्याची भयंकर घटना घडली आहे.
रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. दोन्हीकडून एकमेकांविरोधात वेगवेगळे दावे केले जात आहेत. युक्रेनवर आक्रमण करणाऱ्या रशियन सैन्याची मोठी हानी घडवून आणल्याचा दावा युक्रेनियन सैन्याने केला आहे. रशिया आणि युक्रेनमधील वाद आता आणखी चिघळला आहे. याच दरम्यान युद्ध पेटलेलं असताना मन हेलावून टाकणारी एक घटना आता समोर आली आहे. आईच्या औषधासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेवर रशियन सैनिकांनी गोळ्या झाडल्याची भयंकर घटना घडली आहे. या हल्ल्यामध्ये महिलेसह तिच्या आईचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
द मिररच्या रिपोर्टनुसार, वेलेरिया मक्सेत्स्का असं या महिलेचं नाव असून त्या आपल्या आईसोबत कीव्ह येथील रस्त्यावर थांबली होती. त्याचवेळी रशियन सैनिकांनी केलेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. वेलेरियाची आई खूप आजारी होती. त्यामुळे त्यांनी रुग्णालयात घेऊन जाऊन औषधं आणण्यासाठी त्या घराबाहेर पडल्या होत्या पण त्याच दरम्यान रशियन सैनिकांनी त्यांना गोळ्या घालून ठार केलं. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
I'm enormously sad to share the death of Valeriia "Lera" Maksetska—proud Ukrainian, beloved @USAID implementing partner & brilliant, compassionate leader on building social cohesion & fighting disinformation.
— Samantha Power (@PowerUSAID) March 9, 2022
She was killed by the Russian military just shy of her 32nd birthday. pic.twitter.com/ZoMJJN2CJW
औषधासाठी घराबाहेर पडलेल्या माय-लेकींवर गोळीबार
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर वेलेरिया यांनी युक्रेन सोडून जाण्यास नकार दिला होता. वेलेरिया यांनी देशवासियांना मदत करण्यासाठी आणि त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी कीव्हमध्येच थांबण्याचा निर्णय घेतला होता. मात्र वेलेरिया यांच्या आईचे औषध संपले होते. औषधाच्या शोधात असताना त्यांच्यासमोर रशियन सैनिकांचा ताफा आला. यावेळी रशियन सैनिकांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्याने त्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात वेलेरिया यांच्यासोबतच त्यांची आई आणि वाहनचालकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
बाईकवर 2400 किमीचा प्रवास करून युक्रेनमध्ये माजी सैनिकाने पोहचवली औषधं
ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या जुन्या बाईकने 48 तास 2414 किलोमीटरचा प्रवास करून मोलाचं काम केलं आहे. युक्रेनमधील लोकांना औषधं आणि इतर जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा केला आहे. डेलीमेलने दिलेल्या वृत्तानुसार, लियोन क्रिब असं या व्य़क्तीचं नाव असून त्याने ब्रिटनमधील वेस्ट ससेक्सच्या चेस्टरमधून आपल्या जुन्या बाईकने प्रवास सुरू केला. लियोनने फ्रान्स, बेल्जियम, हॉलंड, जर्मनी आणि पोलंडचा प्रवास केला. त्यानंतर औषधं घेऊन युक्रेनच्या कीव्हमध्ये पोहोचला. त्याने फ्रान्सच्या आर्मीसाठी देखील काम केलं आहे. त्याने पाच देशांतून प्रवास करत कीव्ह गाठलं. लियोनने आपल्यासोबत बँडेज, अँटीसेप्टिक, सेलिन फ्लूड, ट्रॉमा किट्स आणि इतर मेडिकल उपकरणं घेतली होती. ते 48 तास खूप कठीण होते पण लोकांची मदत करता आल्याने मला खूप चांगलं वाटत आहे असं म्हटलं आहे.