रशियाने युक्रेनवर हल्ला केलेल्या घटनेला आज महिना उलटला आहे. मुठभर सैन्याला घेऊन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की लढत आहेत. यामुळे रशियाने फौजांचा मारा वाढविला आहे. हवेतून क्षेपणास्त्रेही जोरदार वार करत आहेत. अशातच युक्रेन मोठ्या संकटात सापडला आहे. या युद्धासाठी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेकडे मोठी मागणी केली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आज युक्रेनपासून अवघ्या ५० किमी अंतरावर आहेत. काल त्यांनी ब्रसेल्समध्ये नाटोच्या सदस्यांना संबोधित केले. यावेळी बायडेन यांनी रशियाला धमकी देताना म्हटले की, जर रशियाने युक्रेनमध्ये रासायनिक शस्त्रास्त्रांचा वापर केला तर नाटो त्याला प्रत्यूत्तर देणार असल्याचे म्हटले आहे. रशिया ज्या प्रकारची शस्त्रे वापरेल नाटो तशाच शस्त्रास्त्रांनी रशियाला प्रत्यूत्तर देईल असे ते म्हणाले.
हे युद्ध एकीकडे महायुद्धाकडे जात असताना झेलेन्स्की यांनी अमेरिकेकडे मोठी मागणी केली आहे. रशियन फौजांच्या आक्रमणासमोर शस्त्रास्त्रे कमी पडू लागली आहेत. दिवसाला आम्हाला एक हजार मिसाईलची गरज असल्याचे त्यांनी अमेरिकेला सांगितले आहे. रशियन फौजांचा मुकाबला करण्यासाठी आम्हाला दिवसाला ५०० जेवलिन आणि ५०० स्टिंगर्सची गरज असल्याचे झेलेन्स्की म्हणाले आहेत.
सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, युक्रेन गेल्या अनेक दिवसांपासून अमेरिकन सरकारकडून अतिरिक्त लष्करी मदत मिळविण्यासाठी आपली यादी अद्ययावत करत आहे. पूर्वी विनंती केलेल्या लष्करी सहाय्यापेक्षा अधिक विमानविरोधी आणि रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे. तसेच या यादीत जेट, अटॅक हेलिकॉप्टर आणि S-300 सारख्या विमानविरोधी यंत्रणा आहेत. यामध्ये स्टिंगर एंटी-एयरक्राफ्ट मिसाइल आणि जेवलिन एंटी टँक मिसाईलची संख्या जास्त आहे.
7 मार्चपर्यंत, यूएस आणि इतर नाटो सदस्यांनी युक्रेनला सुमारे 17,000 रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे आणि 2,000 विमानविरोधी क्षेपणास्त्रे पाठवली आहेत. युक्रेनला येथून सतत लष्करी मदत मिळत आहे. आता हे भांडार संपत आले आहे. यामुळे युद्ध सुरु ठेवायचे असेल तर तातडीने युक्रेनला शस्त्रास्त्रांची मदत लागणार आहे.