रशिया-युक्रेन युद्ध कुठल्याही क्षणी नवे वळण घेऊ शकते. युक्रेनने नुकतेच जी-7 देशांना एक पत्र लिहून इराण आणि सीरियाच्या ड्रोन कारखान्यांवर हल्ला करण्याची परवानगी मागितली आहे. महत्वाचे म्हणजे, गेल्या तीन महिन्यांत रशियाने केलेल्या 600 क्षेपणास्त्र हल्ल्यांत बहुतांश क्षेपणास्त्रे इराणचे असल्याचा दावाही या पत्रात करण्यात आला आहे. युक्रेनने म्हटले आहे की, इराणच्या शहीद ड्रोनच्या निर्मितीत अमेरिकन आणि युरोपियन कंपन्यांचेही कंपोनन्ट्स वापरले जात आहेत. रशिया प्रामुख्याने शहीद ड्रोननेच युक्रेनच्या शहरांवर हल्ले करत आहे.
इराण, सीरिया आणि रशियाच्या ड्रोन निर्मिती कारखान्यांवर आणि या देशांनी ज्या ठिकाणी ड्रोन ठेवले आहेत, त्या ठिकाणांवर हल्ला करण्याची युक्रेनची इच्छा आहे. इराण आणि सीरियावर थेट हल्ला करण्याचा युक्रेनचा इरादा आहे. युक्रेनला कुठल्याही परिस्थितीत युद्धाची व्याप्ती वाढविण्याची इच्छा असल्याचे दिसत आहे. कारण, इराण आणि सीरियाला थेट लक्ष्य केल्यास महायुद्धही होऊ शकते. युक्रेनचा दावा आहे की इराणी ड्रोनमधील 50 हून अधिक इलेक्ट्रिकल कंपोनन्ट्स पाश्चात्य अथवा युरोपीय कंपन्यांचे आहेत.
रशिया इराणच्या ड्रोननं करतोय यूक्रेनवर हल्ले - अमेरिका, स्वित्झर्लंड, नेदरलँड, जर्मनी, पोलंड, कॅनडा आणि जपान या देशांच्या कंपोनन्ट्सचा इराणने ड्रोन निर्मितीत वापर केला आहे. महत्वाचे म्हणजे गेल्या तीन महिन्यांत रशियाने केलेल्या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर इराणी ड्रोनचा वापर करण्यात आल्याचा दावा युक्रेनने केला आहे. रशियाने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात इराणच्या शहीद ड्रोनने युक्रेनवर हल्ला केला होता.