युक्रेनचे राष्ट्रपती वलोदिमिर झेलेंस्की (Volodymyr Zelenskyy) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या चर्चेसंदर्भात आभार मानले आहेत. झेलेंस्की ट्विट करत म्हणाले, रशियाच्या आक्रामक कारवाईला युक्रेनकडून कशा प्रकारे प्रत्त्युत्तर देण्यात येत आहे, यासंदर्भात मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती दिली. तसेच, युद्धाच्या काळात भारतीय नागरिकांना दिली जाणारी मदत आणि वरिष्ठ स्तरावर थेट चर्चेसंदर्भातील युक्रेनची वचनबद्धता याचे भारताने कौतुक केले, असेही ते म्हणाले.
एवढेच नाही, तर युक्रेनमधील जनतेला करण्यात येत असलेल्या मदतीबद्दल आपण भारताचे आभारी आहोत, असेही झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी झालेल्या एका फोन कॉलमध्ये, युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले होते.
पंतप्रधान मोदींनी झेलेन्स्की यांच्यासोबत दुसऱ्यांदा साधला संवाद -रशियाने 24 फेब्रुवारीला कीव्हवर लष्करी कारवाई सुरू केली, तेव्हापासून आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनच्या नेत्यासोबत दुसऱ्यांदा संवाद साधला आहे. यापूर्वीही 26 फेब्रुवारीला पहिल्यांदा बोलणे झाले होते. दरम्यान, राष्ट्रपती पुतिन यांनी कीव्ह, सुमी, खारकीव्ह आणि मारियूपोलमध्ये नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाता यावे, यासाठी तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा केली आहे.