कीव – रशियानं २४ फेब्रुवारीच्या सकाळी यूक्रेनवर हल्ला सुरू करत युद्धाची घोषणा केली. मागील ५ दिवसांपासून यूक्रेनविरुद्ध रशिया युद्ध पेटलं आहे. जगातील अनेक देशांनी रशियाच्या या कृतीचा निषेध केला आहे. पाश्चात्य देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लावले आहेत. तरीही रशिया मागे हटण्यास तयार नाही. रशियाच्या या हल्ल्याचं यूक्रेनही सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे.
यूक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेण्यासाठी रशिया सातत्याने हल्ला करत आहे. त्यात यूक्रेनच्या प्रतिहल्ल्यात रशियाचंही मोठं नुकसान होत आहे. यूक्रेननं कुठल्याही परिस्थितीत रशियासमोर झुकण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता हे युद्ध आणखी पेटलं आहे. बलाढ्य रशियासमोर यूक्रेनच्या सैन्याची संख्या खूप कमी आहे. त्यामुळे अलीकडेच यूक्रेनच्या राष्ट्रपतींनी सक्तीची सैन्य भरती सुरू केली. आता रशियाच्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी यूक्रेननं आणखी एका मोठा निर्णय घेतला आहे.
यूक्रेनच्या जेलमधील खतरनाक कैदी आणि आरोपींची सुटका करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नॅशनल प्रॉसिक्यूटर जनरलनं याबाबत पुष्टी दिली आहे. प्रॉसिक्यूटर जनरल ऑफिसचे अधिकारी एड्री सिनुक म्हणाले की, दोषी कैद्यांचा सर्व्हिस रेकॉर्ड, युद्धाचा अनुभव आणि जेलमधील व्यवहार या सर्व गोष्टींचा विचार करुन या कैद्यांना युद्धात समाविष्ट करण्याचा विचार केला जाणार आहे.
एड्री सिनुक यांनी सांगितले की, सर्गेई टॉर्बिन सुटका झालेला कैदी हा माजी लढाऊ अनुभवी कैद्यांपैकी एक आहे. टॉर्बिनने डोनत्सक आणि लुगांस्क पीपुल्स रिपब्लिकसाठी युद्धात उतरला होता. नागरिक अधिकार कार्यकर्ते आणि भ्रष्टाचारविरोधी कतेरिना हांडजुकवर एसिड फेकल्याचा आरोप आहे. २०१८ मध्ये त्याला ६ वर्ष आणि ६ महिन्याची शिक्षा सुनावली होती. टॉर्बिननं त्याच्या सुटकेनंतर पथक बनवण्यासाठी आधीच्या कैद्यांची निवड केली आहे.
तसेच माजी सैनिक दिमित्री बालाबुखा यांनी २०१८ मध्ये बसस्टॉपवर एका व्यक्तीची चाकू मारून हत्या केली होती. त्यासाठी त्याला ९ वर्षाची शिक्षा झाली. त्याचीही सुटका युद्धासाठी करण्यात आली आहे. यूक्रेन सरकारकडून कीवमध्ये रशियन सैन्याच्या तुकड्यांना रोखण्यासाठी सातत्याने हत्यारं उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तर १८ ते ६० वयोगटातील जे सक्षम पुरुष असतील त्यांना देश सोडण्यास बंदी केली आहे. यूक्रेनमध्ये अनेक लोकं देशाच्या रक्षणासाठी स्वइच्छेने पुढे येऊन मदत करत आहेत.